विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीत 12 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे या निवडणुकीला जास्त रंगत आली आहे आणि निवडणुकीत चुरस वाढली आहे. राज्यातील 4 पक्षांनी आपल्या आमदारांना मुंबईतील 4 वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलं आहे. विधान परिषद निवडणुकी कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. या पक्षांमध्ये सत्ताधारी तीनही पक्ष आणि ठाकरे गटाचा समावेश आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलेलं नाही. दरम्यान, काँग्रेसची नुकतीच एक बैठक पार पडली आहे. या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख नेते देखील उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसचा कोटा संपल्यानंतर उर्वरित मते ठाकरे गटाच्या उमेदवाराला देण्यात यावे, असं आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आलं. विशेष म्हणजे काँग्रेसकडून आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांसाठी व्हीप जारी करण्यात आला आहे. या व्हीपमध्ये महत्त्वाचा आदेश आमदारांना देण्यात आला आहे.
“विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या अकरा जागांसाठी शुक्रवार, दिनांक १२ जुलै, २०२४ रोजी मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला, विधान भवन, मुंबई येथे मतदान होणार आहे, मतदानाची वेळ सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत आहे. महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्षाच्या सर्व विधान सभा सदरयांनी सदर निवडणुकांच्या मतदानात सहभागी होणे अनिवार्य असून त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार मतदान करावे. या पक्षादेश नुसार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्यासंदर्भातील सूचना आपणांस दिनांक १२ जुलै २०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता दालन क्र. १२६, पहिला मजला, महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्ष कार्यालय, विधान भवन, मुंबई येथे देण्यात येणार आहे. पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे मतदान करावे असा पक्षादेश आहे”, असं काँग्रेसच्या व्हीपमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसचे तीन-चार आमदार फुटण्याची शक्यता आहे, असा दावा खुद्द काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. “विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत आम्हाला माहिती आहे की, आमचे तीन-चार लोकं हे फुटणार आहेत”, असा धक्कादायक दावा कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. “आमचे तीन-चार आमदार फुटणार त्यानुसार आम्ही आमची रणनीती आखलेली आहे. आम्हाला माहिती आहे की, आमच्या उमेदवाराला कोणताही दगाफटका होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे. महाविकास आघाडीबद्दल आज ठरवणार आहोत. आमचे जे दोन-तीन लोकं आहेत, कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेला, कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे, एक टोपीवाला कधी इकडे असतो तर कधी तिकडे असतो. तर एक नांदेडवाला आहे. या चारही जणांचं कसं करायचं ते आम्ही ठरवणार आहोत. आम्हाला जे चार दिसत आहेत त्यांचे कान कसे टोचायचे ते आज रात्री ठरणार आहे आणि सर्व रणनीती आखणार आहोत”, असं कैलास गोरंट्याल म्हणाले आहेत.