मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्याबाबतच्या एका बातमीमुळे खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये असलेले मुंबईतील बडे नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. मिलिंद देवरा हे काँग्रेस सोडून शिंदे गटात जातील, अशी कुणालाही कल्पना नव्हती. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात आणखी एक मोठी चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे मुंबईतील ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होतील, अशा चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर बाबा सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. मी असा लपून जाणार नाही. जेव्हा जाईन तेव्हा उघडपणे जाईन, असं सूचक वक्तव्य बाबा सिद्दीकी यांनी केलं आहे. “सध्या मी काँग्रेसमध्ये असून, जाईन तेव्हा सर्वांना सांगून जाणार”, अशी प्रतिक्रिया बाबा सिद्दीकी यांनी दिली आहे. बाबा सिद्दीकी यांनी सध्यातरी याबाबतच्या चर्चांचं खंडन केलं आहे. पण त्यांची वक्तव्य संभ्रम निर्माण करणारी आहेत. “कुणाला माहिती होतं की, मिलिंद देवरा, कृपाशंकर सिंह जातील”, असं बाबा सिद्दकी पक्षांतराच्या चर्चांवर म्हणाले आहेत.
“खरं-खोटं काही नाही. मी अजूनसुद्धा तुमच्यासोबत आहे. तसं काही नाही. मला माहिती नाही ही गोष्ट कशी सुरु झाली. आता सुरु झाली तर आपल्याला सामोरं जावं लागणार”, असं बाबा सिद्दीकी म्हणाले. सिद्दीकी यांना आपल्याला अजित पवार गटाकडून लोकसभेची ऑफर आल्याची चर्चा आहे का? असा प्रश्न विचारला असता “याबद्दल तुम्हाला माहिती असेल. मला काही माहिती नाही”, असं ते म्हणाले. “मी काँग्रेसमध्ये आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत तर ते मला कशी ऑफद देऊ शकतात? मला काय म्हणायचंय ते तुम्हाला समजतंय ना? कसं ते ऑफर करु शकतात?”, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
“मला माहिती नाही ही गोष्ट कशी समोर आली. पण आता आली आहे, तुम्हाला माहिती असेल. मी जायचं असेल तर मी उघडपणाने जाईन. लपूनछपून जाणार नाही. जाण्याचा प्रश्नच येत नाही, मी काय बोलू”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.
बाबा सिद्दीकी हे मुंबईतील काँग्रेसचे बडे नेते आहेत. ते मुंबईच्या वांद्रे येथून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सध्या त्यांच्या गटासाठी मुंबईत मुस्लिम चेहऱ्याची गरज आहे. अजित पवार यांच्याकडून आमदार नवाब मलिक यांना आपल्या पक्षात सहभागी करुन घेण्याचे प्रयत्न झाले. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाब मलिक यांना सत्तेत सहभागी करुन घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने अजित पवार यांची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. पण अजित पवार यांची बाबा सिद्दीकी यांच्या रुपाने ती इच्छा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे.
बाबा सिद्दीकी हे मुंबईतील मुस्लिम समाजाचे बडे प्रस्थ आहेत. त्यांना मुंबईत मुस्लिम समाजात मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचे चिरंजीव जिशान सिद्दीकी हे मुंबईच्या वांद्रे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच ते मुंबई युवा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. बाबा सिद्दीकी हे वांद्र्यात दरवर्षी रमजानच्या वेळी इफ्तार पार्टीचं आयोजन करतात. त्यांच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूड स्टार सलमान खान, शाहरुख खान सारखे अनेक मोठे स्टार येतात. त्यामुळे त्यांची चांगली क्रेझ आहे.