‘225 जागा जिंकणारच, शरद पवार यांचा अंदाज कधीच चुकत नाही’, काँग्रेस आमदाराचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jul 11, 2024 | 6:29 PM

शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत सर्वात मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? याबाबतचा आकडाच थेट शरद पवारांनी सांगितला आहे. त्यांच्या या दाव्यावर आता राज्यातील विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे.

225 जागा जिंकणारच, शरद पवार यांचा अंदाज कधीच चुकत नाही, काँग्रेस आमदाराचं मोठं वक्तव्य
काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि शरद पवार यांचा फोटो
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीबाबत आज मोठं वक्तव्य केलं. महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत तब्बल 225 जागा जिंकेल, असा मोठा दावा शरद पवारांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचं भाकीत कधीच खोटं ठरत नाही. त्यांनी लोकसभा निवडणुकीत 31 जागा जिंकणार, असा दावा केला होता. विशेष म्हणजे आम्ही तेवढ्या जागा जिंकलोदेखील, त्यामुळे शरद पवार यांच्या दाव्यानुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 288 पैकी 225 जागा जिंकेल”, अशी प्रतिक्रिया कैलास गोरंट्याल यांनी दिली.

कैलास गोरंट्याल यांनी यावेळी आमदार रवी राणा यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली. “रवी राणा माझे खास मित्र आहेत. पण भाजपसाठी त्यांनी एवढं करूनही त्यांना भाजपवाले बडनेरामधून तिकीट देऊ नका म्हणतात. त्याच्यावर एक शेर आहे. हम बा वफा होके भी ऊनके नजरोसे गिर गये, शायद उन्हे तलाश किसी बेवफा की थी, हा शेर त्यांच्यासाठी आहे”, असं म्हणत कैलास गोरंट्याल यांनी टोला लगावला. “रवी राणा यांना विरोध करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. पण फडणवीस सुद्धा काय करणार? कारण त्यांना आता त्यांचे जास्त लोकं जिंकून द्यायचे आहेत. याशिवाय भाजपची कोर कमिटी रवी राणा या माझ्या मित्राला विरोध करत आहे”, असं कैलास गोरंट्याल म्हणाले.

बावनकुळे यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. “शरद पवार वेगवेगळी विधाने करत आहेत. आधी बोलले 155. त्यानंतर आणखी एक वेगळा आकडा बोलले आणि आता 225 बोलत आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलणार आहेत, असा प्रचार करून मतं घेतली. जनतेची दिशाभूल करुन मत घेतली. खोटारडेपणा एकदाच चालतो वारंवार चालत नाही”, असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यानी शरद पवारांना दिलं. “महायुती सरकारने सर्वच वर्गातील जनतेला वेगवेगळ्या सवलती आणि योजना दिल्या आहेत. महाविकास आघाडीला मतं दिली तर मोदी सरकारच्या सर्व योजना महाविकास आघाडी सरकार बंद पाडेल. शिंदे-फडणवीस सरकारच्या योजना बंद पडतील”, असा मोठा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

‘शरद पवारांचा आत्मविश्वास वाढलाय, शिंदेंची जादू चालते’

शरद पवार यांच्यादाव्यावर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्हीच जास्त जागा जिंकणार. शरद पवारांचा आत्मविश्वास वाढलाय. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जादू चालते. त्यांच्या एवढ्या जागा येणार नाहीत. भाजपने कितीही जागा मागितल्या तरी आमच्यात वादविवाद नाहीत. त्यांना तेवढ्या जागा अजून मिळाल्या नाहीत. त्यांनी मागणी केलीय, ठिक आहे आम्ही आमच्या जागा लढवू”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.