विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीकडे मतांचा कोटा पूर्ण असताना शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. काँग्रेसमधील काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे महायुतीचे सर्व आमदार निवडून आले आहेत. काँग्रेसची मते फुटल्यामुळे महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीकडील मतांचा कोटा पाहता प्रत्येक पक्षाने प्रत्येकी 1 असे एकूण केवळ 3 उमेदवार दिले होते. पण या निवडणुकीत काँग्रेसची काही मते फुटल्यामुळे शरद पवार गटाचा पराभव झाला आहे. या निवडणुकीनंतर काँग्रेसची मते फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे कुणीकुणी क्रॉस व्होटिंग केली याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी याबाबत माहिती दिली आहे. आपण ट्रॅप लावला होता आणि त्या ट्रॅपमध्ये क्रॉस व्होटिंग करणारे आमदार सापडले आहेत. त्यांच्यावर आता पक्षातून काढून टाकण्याची कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
“विधान परिषद निवडणुकीवेळी आम्ही ट्रॅप लावला होता. या ट्रॅपमध्ये बदमाश लोकं सापडलेली आहेत. आम्ही वरिष्ठांना हे कळवलेलं आहे. लवकरच ज्यांनी पक्षविरोधी काम केलं, पक्षासोबत गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. आम्ही आताच हायकमांडला याबद्दलचा अहवाल सादर केला आहे”, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
“गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या उमेदवारीवेळी, जे बदमाश होते ज्यांनी त्यावेळेसही विश्वासघात घेतला, त्यांच्या पाठीमागे आम्ही या निवडणुकीत ट्रॅप लावलेला होता. मी कुठेही नाकारत नाही. जे कुणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅपमध्ये आले आहेत. अशा विश्वासघातकी आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांच्यावर अशी कारवाई केली जाईल की पुन्हा कुणी तसं कृत्य करण्याची हिंमत करणार नाही”, अशी आक्रमक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
“आपल्याला आम्ही सगळे नियम सांगितले आहेत. आपल्या लक्षात असेल आमच्या पक्षातील काही नेते सोडून गेले. त्यांच्याबरोबर काही आमदार होतेच. तीपण नावे तुमच्यासमोर आहेत. आणखी काही लोकं आहेत. याबाबत हायकमांडशी चर्चा केल्यानंतर ताबोडतोब, आता कोणतीही कमिटी येणार नाही, आता हायकमांडच्या आदेशाने आपल्याला नावेदेखील कळतील”, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
“काँग्रेस पक्ष लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. काँग्रेस विश्वासावर देशावर काम करत आहे. त्या विश्वासावर आम्ही आमदार, खासदार निवडून आणतो. त्यामुळे आता गद्दारी करणाऱ्यांवर अशी कारवाई केली जाईल की पुन्हा कुणाची तसं कृत्य करण्याची हिंमत होणार नाही”, असं नाना पटोले म्हणाले.