महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आज मोठ्या हालचाली घडल्या आहेत. काँग्रेस नेते संजय निरुपम यांचं नाव स्टार प्रचारक यादीतून हटवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे संजय निरुपम यांच्यावर आता पक्षातून हकालपट्टी करण्याची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत मुंबईत काँग्रेसच्या गोटात आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत संजय निरुपम यांच्यावर पक्षातून बडतर्फची कारवाई करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. हा प्रस्ताव दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर काँग्रेस हायकमांड काही निर्णय घेणार, त्याआधीच संजय निरुपम यांनी ट्विटरवर आपली भूमिका मांडली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. पण या मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण कीर्तिकरांच्या उमेदवारीला संजय निरुपम यांनी विरोध केला आहे. ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेच संजय निरुपम यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांच्याकडून ठाकरे गटावर सडकून टीका करण्यात आली. अखेर याचमुळे पक्षाने त्यांचं नाव स्टार प्रचारक यादीतून काढून टाकलं. या कारवाईनंतर संजय निरुपम यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरुपम यांनी एक आठवड्याचा इशारा आपल्या पक्षाला दिला होता. आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर आपण एक आठवड्यात वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा निरुपम यांनी दिला होता. याच इशाऱ्याची आठवण आज संजय निरुपम यांनी काँग्रेसला करुन दिली आहे.
“काँग्रेस पक्षाने माझ्यासाठी जास्त ऊर्जा आणि स्टेशनरी कष्ट घेऊ नये. त्याऐवजी त्यांनी आपली थोडीफार राहिलेली ऊर्जा आणि स्टेशनरीचा उपयोग पक्ष वाचवण्यासाठी करावा. तसंही पक्ष भीषण आर्थिक संकाटातून जात आहे. मी जो एक आठवड्याची मुदत दिली आहे ती उद्या संपणार आहे. मी उद्या स्वत: निर्णय घेणार”, असं सूचक ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे.
कॉंग्रेस पार्टी मेरे लिए ज़्यादा ऊर्जा और स्टेशनरी नष्ट ना करे।
बल्कि अपनी बची-ख़ुची ऊर्जा और स्टेशनरी का इस्तेमाल पार्टी को बचाने के लिए करे।
वैसे भी पार्टी भीषण आर्थिक संकट के दौर से गुजर रही है।
मैंने जो एक हफ़्ते की अवधि दी थी,वह आज पूरी हो गई है।
कल मैं खुद फ़ैसला ले लूँगा।— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) April 3, 2024
मुंबईतील काँग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांनी याआधीच सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. तर मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसची मुंबईतील ताकद आधीच कमी झाली आहे. आता संजय निरुपम यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देवून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला तर पुन्हा पक्षाची हानी होणार आहे. त्यामुळे आता संजय निरुपम उद्या काय भूमिका घेतात? याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.