संजय राऊत यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदांना काँग्रेस नेताही वैतागला; म्हणाले…

| Updated on: Dec 30, 2023 | 4:35 PM

शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे दोन्ही मित्र पक्ष आहेत. दोन्ही पक्ष महाविकास आघाडीचे अविभाज्य घटक आहेत. महाविकास आघाडीचा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. असं असताना ठाकरे गट आणि काँग्रेसचे दोन नेते जागावाटपाच्या मुद्द्यावरुन एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत.

संजय राऊत यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदांना काँग्रेस नेताही वैतागला; म्हणाले...
Follow us on

मुंबई | 30 डिसेंबर 2023 : महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 23 जागांवर दावा केला आहे. पण काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सर्वांना समसमान जागावाटप व्हावं, अशी मागणी केली आहे. निरुपण यांनी मुंबईत 3 जागांवर दावा केला आहे. त्यावर संजय राऊतांनी जागवाटपाचा फॉर्म्युला दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करुन ठरणार आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील काँग्रेस नेते काही दावा करत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करतो, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या या भूमिकेवरुन संजय निरुपम यांनी निशाणा साधला आहे. निरुपण यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. “स्थानिक नेत्यांनी बोलणार नाही हा संजय राऊत यांचा अहंकार आहे”, असं प्रत्युत्तर संजय निरुपम यांनी दिलं.

“संजय राऊत यांनी काल जे वक्तव्य केलं त्याबद्दल त्यांना आज समजलं असावं की, त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं आणि काँग्रेसची मुंबईत ताकद आहे”, असं संजय निरुपम म्हणाले. “इथे शिवसेनेचा एक नेता ज्याच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे तो या परिसरात फिरतोय, उमेदवारी जाहीर झाल्याचं सांगतोय (अमोल किर्तीकर यांच्यावर टीका), तो खिचडी घोटाळ्याचा आरोपी आहे, 1 कोटी 60 लाख रुपये चेकने लाच घेतली. त्याची चौकशी सुरू आहे. ईओडब्ल्यू चौकशी करतेय, ईडी कधीही कारवाई करू शकते. मग काय तुरूंगातून उमेदवारी देणार का?”, असा खोचक सवाल संजय निरुपम यांनी केला.

‘आता काय मविआत बिघाडी करायची आहे का?’

“संजय राऊत यांनी पत्रकार परिषद थांबवायला हवी. काँग्रेस नेत्यांना सल्ले देऊ नका. शिवसेनेचे नेते जे सध्या राहिलेले आहेत ते कधी पळून जाणार हे संजय राऊत यांनाही माहीत नसेल. शिवसेना मुंबईत एकही खासदार काँग्रेस शिवाय निवडून आणू शकत नाही”, अशा शब्दात संजय निरुपण यांनी निशाणा साधला. “संजय राऊतांनी ‘सामना’च्या वृत्तपत्रात लिहून-लिहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं नातं बिघडवलं. आता काय मविआत बिघाडी करायची आहे का?”, असा सवाल संजय निरुपम यांनी केला.

यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं. “प्रकाश आंबेडकर यांचं महाविकास आघाडीत स्वागत. पण टू इज कंपनी थ्री इज क्राऊंड हे बाळासाहेबांचं स्टेटमेंट, पण चौथी पार्टी आणायची आहे तर आणा, पण आंबेडकर यांनी जागावाटपाबाबत कुठलीही अट ठेवू नये”, अशी भूमिका संजय निरुपम यांनी मांडली.