‘मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्यास आमचा विरोध’, भुजबळांनंतर वडेट्टीवारांनी दंड थोपटले

| Updated on: Nov 07, 2023 | 3:02 PM

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यास विरोध केला आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडली आहे. त्यानंतर काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देखील मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्यास विरोध केला.

मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्यास आमचा विरोध, भुजबळांनंतर वडेट्टीवारांनी दंड थोपटले
vijay wadettiwar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण पुन्हा तापताना दिसत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास विरोध केलाय. भुजबळांनी काल पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्यास विरोध दर्शवला. “आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या. सरसकट आरक्षण देण्यास आधीही विरोध होता आणि आताही आहे”, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली.

“कुणबी नोंदणीचं काम शिंदे समितीला दिलं आहे. त्याबरोबरच ओबीसींच्या सर्व जाती शोधाव्या आणि श्वेतपत्रिका काढा. ओबीसींना ६७ पुरावे मागितले जात आहेत. त्यामुळे ते लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे अख्ख्या नोंदणी शोधा. त्यातून सांगा या जाती ओबीसीच्या आहेत या जाती कुणबी आहेत हे सांगा. आमचाही त्रास कमी होईल. आम्हालाही उतारे शोधताना त्रास होतो. प्रमाणपत्रासाठी त्रास होतो, तो कमी होईल. जो समाज हक्कासाठी भांडतो त्यामुळे मला त्यांच्या सोबत उभं राहणं भाग आहे. त्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून”, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली.

“ओबीसीतील अनेक जातींचा अवस्था वाईट आहे. त्यांना काहीच मिळालं नाही. इथे बळी तो कानपिळी आहे. त्यामुळे ओबीसीतील असलेल्या घटकांना जे मिळालं पाहिजे ते मिळत नाही, ते मिळालं पाहिजे”, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी यावेळी मांडली.

‘अरे हेच आरक्षणाला समाजाला अपुरं आहे’

“शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या विदर्भात होतात. ते कोण आहेत? ते ओबीसी आहेत. का होतात? कारण ओबीसीमुळे सर्व काही मिळतं अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं गेलं. अरे हेच समाजाला अपुरं आहे. तुम्ही येणार तर वाढवून घ्या. वेगळा प्रवर्ग घ्या. तुम्ही 50 टक्केच्या आतमध्येची मागणी करताय. हा निर्णय सरकारने जाहीर केलाय. मग वाढवून द्या. ओबीसी समाजाला दुखवू नका. मराठा समाजालाही दुखवू नका. गरीब मराठा समाजाला न्याय मिळावं अशी आमचीदेखील भूमिका आहे. सरकार सरकार म्हणून जी भूमिका मांडायला हवं ती मांडताना दिसत नाही”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.