काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे नेते उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकील पदाच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. भाजपचे नेते, विशेष सरकारी वकील कसे असू शकतात, असा सवाल करत भाजपनं आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत वकील उज्ज्वल निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. उज्ज्वल निकमांनी उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. उज्ज्वल निकम यांचा वर्षा गायकवाड यांनी 16 हजार 514 मतांनी पराभव केला होता.
निवडणुकीत उतरण्याआधी निकमांनी विशेष सरकारी वकीलपदाचा राजीनामा दिला होता .आता निवडणुकीतल्या पराभवानंतर निकमांची राज्य सरकारनं विशेष सरकारी वकील म्हणून फेरनियुक्ती केली आहे. काँग्रेसनं निकम यांच्या नियुक्तीचा विरोध केला तर भाजपनं समर्थन केलंं. TV9शी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, माझ्या नियुक्तीला कोणाला चॅलेंज करायचं असेल तर करावं. योग्य वेळी यावर
मी माझं मत व्यक्त करेल.
सरकारकडून खटले लढवताना विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी आपली कारकीर्द गाजवली आहे. वकील म्हणून कोर्टात, निष्पक्ष असावं मात्र वकील निकमांनी भाजपचाही राजकीय कोट घातलेला असल्यानं आक्षेप असल्याचं काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं म्हणणं आहे.
मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत. त्यापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत झाली. कारण येथून भाजपने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यापुढे त्यांचं मोठं आव्हान होतं. मात्र, या लढतीत उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला.
या जागेवर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना 445,545 मते मिळाली आहेत. भाजपचे उज्ज्वल निकम हे दुसऱ्या क्रमाकांवर होते. उज्ज्वल निकम यांना एकूण 429,031 मते मिळाली. तर NOTA ला 9,749 मते मिळाली. निकम यांचा फक्त १६ हजार मतांना पराभव झाला.