नंदकिशोर गावडे, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 14 फेब्रुवारी 2024 : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेसकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचं संख्याबळ पाहता चंद्रकांत हंडोरे हे सहज राज्यसभेची निवडणूक जिंकून येऊ शकतात. पण तरीही काही दगाफटका झाला तर? दगाफटका म्हणजे आपल्या उमेदवाराला मतदान न करता दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यात आलं तर काँग्रेसचं नुकसान होऊ शकतं. याआधी विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेससोबत तसा प्रकार झालाय. त्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे आता काँग्रेसकडून सर्व गोष्टींची खबरदारी घेतली जात आहे.
विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या याआधी अनेकदा आल्या होत्या. पण त्यांनी त्या अफवा असल्याचं म्हणत फेटाळलं होतं. पण अशोक चव्हाण यांनी आता काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत थेट भाजपात प्रवेश केला आहे. त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देखील मिळाली आहे. अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे 10 ते 15 आमदार राजीनामा देवून भाजपात प्रवेश करु शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण काँग्रेसकडून या चर्चांचं खंडन केलं जात आहे. असं असलं तरी काँग्रेसकडून खबरदारी नक्की घेतली जात आहे. काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातोय.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्त्वाची बैठक होत आहे. ही बैठक विधान भवनातील काँग्रेसच्या कार्यालयात पार पडत आहे. या बैठकीसाठी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थति आहेत. काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक आमदार या बैठकीला उपस्थित आहेत.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. या मुद्द्यावर काँग्रेसच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपने चौथा उमेदवार दिला आणि मतांची जुळवाजुळव करावी लागली तर कशी करता येईल, याबाबतची चर्चा या बैठकीत केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.