राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत असेच यश मिळवून राज्यात काँग्रेस विचाराचे सरकार आणण्यासाठी प्रदेश काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला येत्या शुक्रवारी १९ जुलैला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते मुंबईत बैठका घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. तसेच काँग्रेस नेते, पदाधिकारी, खासदार आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आणि के. सी. वेणुगोपाल तथा प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता गरवारे क्लब येथे बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते आ. सतेज (बंटी) पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीनंतर दुपारी 2 वाजता प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा प्रभारी, खासदार, आमदार, आघाडी संघटनांचे प्रमुख यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच मतदार याद्या पुनरिक्षणाचा आढावा तसेच संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे, आणि रणनिती ठरवली जाणार आहे. या बैठकीला के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत दोन महत्त्वाच्या मुद्द्यावंर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सुरुवातीला विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभेला कोणकोणत्या जागा काँग्रेसने लढवाव्यात यावर बैठकीत चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीत कोणत्या जागांवर काँग्रेसने दावा करावा यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधान परिषद निवडणुकीत काही काँग्रेस आमदारांकडून करण्यात आलेलं क्रॉस व्होटिंग. या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर बैठकीत चर्चा होऊन त्याच दिवशी कारवाई होण्याची शक्यता आहे.