बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईत मंत्रालयाच्या समोर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार सहभागी झाले आहेत. पोलिसांना आंदोलकांना रोखून धरले आहे. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. मंत्रालयाच्या गेटपर्यंत हा मोर्चा जाणार होता. पण त्याआधीच पोलिसांनी आंदोलकांनी ताब्यात घेतले आहे.
बदलापूर बलात्कार प्रकरणी आरोपीला 26 तारखेपर्यंत कल्याण न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने अशा प्रकारचं अजून काही लैंगिक शोषण व कृत्य केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. तर मुलींना आरोपी काय बोलायचा न्यायचा आणि त्यांच्यावर कसा अत्याचार करायचा या संदर्भात चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली गेली होती. पोलिसांच्या या मागणीनंतर कल्याण न्यायालयाने 26 तारखेपर्यंत अक्षय शिंदे याला पोलीस कोठडी सुनावली आहे
तब्बल 11 तासांनंतर, बदलापूर रेल्वे स्टेशनवरचं आंदोलन पोलिसांनी लाठीचार्ज करुन संपवलं. साडे 3 वर्षांच्या 2 मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात बदलापूरकर संतापले. आणि 11 तास रेल रोको करत लोकल वाहतूक थांबवली. पोलीस अधिकारी आणि मंत्री गिरीश महाजनांच्या आवाहनानंतरही आंदोलक ट्रॅकवरुन हटण्यास तयार नव्हते. त्यामुळं अखेर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला. आणि आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला.
बदलापुरात साडे 3 वर्षांच्या 2 मुलींवर झालेल्या अत्याचारा विरोधात लोकांचा उद्रेक पाहायला मिळाला. नराधम आरोपी, अक्षय शिंदेला तात्काळ फाशी देण्याच्या मागणीसाठी बदलापूरकर, रेल्वे स्टेशनवर एकवटले…आणि सकाळी 8 वाजतापासून रेल रोको केला. सर्वात आधी सकाळी साडे 6 वाजता पालकांसह नागरिक बदलापूरच्या आदर्श शाळेबाहेर जमले आणि आंदोलन केलं नंतर हे आंदोलक 8 वाजता बदलापूर स्टेशनला आले आणि रेल रोको आंदोलन केलं. सकाळी 9 वाजता आंदोलन पाहून स्टेशनवरचे प्रवाशीही या आंदोलनात सहभागी झाले आणि ठिय्या आंदोलन सुरु झालं. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी नागरिक संतप्त झाले.
सकाळी साडे 9 वाजतापासून आंदोलनामुळं कल्याण ते कर्जत ही रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सकाळी 11 वाजता पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांना कारवाईचं आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. दुपारी 1 वाजता रेल्वे वाहतूक सुरु करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जचा प्रयत्न केला..पण संतप्त नागरिकांनी दगडफेक केली. दुपारी पावणे 4 वाजता मंत्री गिरीश महाजन बदलापूर स्टेशनला आले आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
अखेर 5 वाजून 51 मिनिटांनी रेल्वे ट्रॅकवर उतरुन पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज सुरु केला..आणि प्रवाशांना पांगवण्याचा प्रयत्न केला. आरोपी अक्षय शिंदेला तात्काळ फाशी द्या या मागणीसाठी बदलापूरकर आक्रमक होते. आरोपीला ताब्यात द्या, या मागणीसाठी महिलाही आक्रमक झाल्या.
गृहमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कडक कारवाईचं आश्वासन दिलं. मात्र नागरिक आपल्यावर मागणीवर ठाम राहिले. मंत्री गिरीश महाजनांनीही बदलापूर रेल्वे स्थानकात येवून संतप्त नागरिकांशी संवाद साधला. पण महाजनांसमोरही आंदोलकांनी फाशी, फाशीच्या घोषणा दिल्या.
आरोपीला फाशी द्या. नको लाडकी बहीण योजना, हवी सुरक्षा असेही पोस्टर झळवण्यात आले. तसंच फाशीसाठी दोरखंडही आणून आपला राग नागरिकांनी व्यक्त केला. तर कायद्यानुसार जी कारवाई तातडीनं करायची आहे ती कारवाई करणार, असं आश्वासन गृहमंत्री फडणवीसांनी दिलं. तर ज्या पद्धतीनं बदलापूरच्या रेल रोको आंदोलनात लाडकी बहीणचे पोस्टर झळकले. त्यावरुन काहींनी या घटनेत राजकारण केल्याचं मंत्री महाजनांनी म्हटलं आहे.
बदलापूरच्या अत्याचार प्रकरणात 22 वर्षीय आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आलीय. गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळें यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आलंय. मात्र या कारवाईनंतरही आंदोलक आक्रमक होते. अखेर 10 तासांनी लाठीचार्ज करुन पोलिसांनी रेल्वे वाहतूक सुरु केली.