रस्त्यावर चुली मांडल्या, महागाईची तिरडी, मोटारसायकलची अंत्ययात्रा, सायकलवरून प्रवास; काँग्रेसचं आंदोलन पेटलं

| Updated on: Jul 09, 2021 | 6:23 PM

वाढते इंधनाचे दर आणि त्यामुळे महागाई भडकल्याने काँग्रेसने आज दुसऱ्या दिवशीही जोरदार आंदोलन केलं. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच चुली पेटवून भाकरी शेकल्या. (Congress stages protest in all over maharashtra over fuel price hike)

रस्त्यावर चुली मांडल्या, महागाईची तिरडी, मोटारसायकलची अंत्ययात्रा, सायकलवरून प्रवास; काँग्रेसचं आंदोलन पेटलं
Follow us on

मुंबई: वाढते इंधनाचे दर आणि त्यामुळे महागाई भडकल्याने काँग्रेसने आज दुसऱ्या दिवशीही जोरदार आंदोलन केलं. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच चुली पेटवून भाकरी शेकल्या, तर पुरुष कार्यकर्त्यांनी सायकल आणि बैलगाडीतून प्रवास करत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध नोंदवला. काही ठिकाणी महागाईची तिरडी काढण्यात आली, तर काही ठिकाणी मोटारसायकल आणि गॅस सिलिंडरची अंत्ययात्रा काढण्यात आली. वाढत्या महागाईच्याविरोधात काँग्रेसने राज्यभरात अनोखं आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला आहे. पुढील आठ दिवस राज्यभरात हे आंदोलन चालणार आहे. (Congress stages protest in all over maharashtra over fuel price hike)

काँग्रेस पक्षाच्या वतीने महागाई व इंधन दरवाढीविरोधात 10 दिवसांचे आंदोलन कालपासून सुरू असून आज महिला काँग्रेसने राज्यभर चूल मांडून आंदोलन केले. नागपूर येथे महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तर अमरावती येथे महिला व बाल कल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुण्यातील महिला आंदोलनात राज्यमंत्री विश्वजित कदम यांनीही सहभाग घेतला. कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी महिला काँग्रेसने आंदोलन केले.

डब्बे नव्हे इंजिन बदलण्याची वेळ

मोदी सरकार मागील 7 वर्षात देश अधोगतीकडे घेऊन गेले आहे. 70 वर्षात काँग्रेसच्या सरकारांनी देशाला विविध योजना व प्रकल्पाच्या माध्यमातून एक समृद्ध राष्ट्र म्हणून उभे केले होते. परंतु मोदी सरकारने 70 वर्षातील हे वैभव अवघ्या 7 वर्षात विकण्याचा सपाटा लावला आहे. नोटबंदी, जीएसटीने मोठे नुकसान केले. महागाई, इंधन दरवाढ, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळी यांच्या महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना सरकारमधील मंत्री बदलून काही उपयोग होणार नाही. डब्बे बदलण्यापेक्षा देशाला खड्यात घालणारे इंजिनच बदलण्याची वेळ आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नोकरदारांचे जगणे कठीण

पुणे येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच सामान्य जनतेला महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. या महागाईने सामान्य जनतेबरोबरच मध्यमवर्ग व नोकरदारांचे जगणेही कठीण झाले आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे, लाखो रोजगार गेले. लोकांच्या हातात पैसे नाहीत तर दुसरीकडे महागाईने उच्चांक गाठला आहे. या महागाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून मोदी सरकारचा निषेध करत आहे. 17 तारखेपर्यंत राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरुच राहणार आहे. सामान्य जनतेचा महागाईविरोधातील आवाज दिल्लीच्या सरकारपर्यंत पोहचवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. या पत्रकार परिषदेला कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम पांडे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

मोटारसायकलची अंत्ययात्रा

वाढती महागाई आणि इंधनदरवाढीच्याविरोधात आज गोंदिया शहरातून मोटारसायकलची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जयस्तंभ चौकात मुंडन आंदोलन केले. आंदोलनादरम्यान मोदी सरकार मुर्दाबादचे नारे देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात शेकडो काँग्रेस आणि एनएसयुआयचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोदींच्या फोटोजवळ पिपाण्या वाजवल्या

इंधन दरवाढीच्या विरोधात ठाण्यात महिला काँग्रेसने तीव्र आंदोलन केले. महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर जोरदार निदर्शन करत निषेध नोंदवला. यावेळी मोदी सरकारला जागे करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या फोटोच्या कानाजवळ महिला पदाधिकाऱ्यांनी पिपाण्या, भोंगे वाजवत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा बाजी केली. त्याचबरोबर गॅस सिलेंडरचे दर वाढल्याने मोदी सरकारला शेणाच्या गोवऱ्या भेट म्हणून देण्यात आल्या. ठाणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा शिल्पा सोनोने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.

सांगलीत सह्यांची मोहीम

सांगलीतही इंधन दरवाढीविरोधात महिला काँग्रेसने आक्रमक आंदोलन केले. यावेळी महिला काँग्रेसकडून सह्यांची मोहीम घेण्यात आली. तर पेट्रोल पंपावरच आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलक महिलांनी पेट्रोल पंपावर घोषणाबाजी करत पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या वाहन धारकांच्या सह्या घेतल्या.

कल्याणमध्ये शेणीचा आहेर

महिला काँग्रेस तर्फे महिला अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वात कल्याणमध्ये इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यानी तहसील कार्यालयाबाहेर केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत नायब तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी महिला काँग्रेसने केंद्र सरकारला शेणी भेट दिली. मात्र शेणी घेण्यास नायब तहसीलदार सुषमा बांगर त्यांनी नकार दिला. सातत्याने इंधन दरवाढ होत असून गृहिणींचे बजेट कोलमडले त्यामुळे आता सरकारने गृहिणींवर शेणी वापरण्याची वेळ आली आहे, असा संताप कांचन कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला.

महागाईची तिरडी, गॅस सिलिंडरची अंत्ययात्रा

महागाई विरोधात आज नागपूरात महिला काँग्रेसने आंदोलन केलं. यावेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी हातात वाढत्या महागाईची तिरडी घेऊन केंद्र सरकारचा निषेध केला. या आंदोलनात गॅस सिलिंडरची प्रेतयात्रा काढून चुलीवर स्वयंपाक करण्यात आला. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं. (Congress stages protest in all over maharashtra over fuel price hike)

संबंधित बातम्या:

जोपर्यंत आज्ञा असेल तोपर्यंत विरोधात बसणार; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Maharashtra Coronavirus LIVE Update : देशात गेल्या 24 तासांत 43 हजार 393 नवे कोरोना रुग्ण, 911 जणांचा मृत्यू

Maharashtra News LIVE Update | फी भरली नाही म्हणून विद्यार्थींना शाळेत बसू न देणार्‍या राज्यातील 32 शाळांना नोटीस

(Congress stages protest in all over maharashtra over fuel price hike)