मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी राज्यात महाविकास आघाडीकडून रविवारी आंदोलन करण्यात आले. राज्यातील प्रत्येक शहरांत जोडे मारो आंदोलन झाले. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपने आज महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अन् भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला केला. काँग्रेसने शिवाजी महाराजांसंदर्भात काय, काय केले, त्याची उदाहरणे सांगत आता काँग्रेसला माफी मागण्यास लावणार का? असा प्रश्न विचारला.
पहिली गोष्ट तर उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, नेहरूंनी शिवाजी महाराजांच्याबद्दल डिस्कव्हरी ऑफ इंडियात जे लिहिलंय त्याबद्दल काँग्रेसला माफी मागायला लावणार का? मध्यप्रदेशात काँग्रेसने बुलडोझर लावून शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला त्यावर पवार ठाकरे मूग गिळून बसले आहेत. त्यावर का बोलत नाही. कर्नाटकात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, त्याबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. आधी त्याचं उत्तर दिलं पाहिजे, असा हल्ला भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
इतके वर्षे आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की महाराजांनी सुरत लुटली. परंतु खरा इतिहास तो नाही. महाराजांनी सुरत लुटली नव्हती तर तो खजिना घेऊन योग्य त्या लोकांना दिला होता. हा स्वराज्याचा खजिना होता. त्यांनी आक्रमण केलं होतं. पण त्यांनी लूट कधी केली नव्हती. महाराज काही लूट करायला गेले नव्हते, पण असा इतिहास आम्हाला शिकवला गेला. इतकी वर्षे काँग्रेसने हा इतिहास शिकवला त्याची काँग्रेसला माफी मागायला सांगणार आहात की त्यांचे मिंधेपण स्वीकारणार आहात हे सांगितलं पाहिजे, असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
महाराजांच्या पुतळ्यावरून महाविकास आघाडीकडून गलिच्छ राजकारण सुरु आहे. त्याच्या विरोधात भाजपने रविवारी राज्यभर आंदोलन केले. काही शहरांमध्ये मौन बाळगून विरोध दर्शवीला आहे. काही ठिकाणी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला आहे.