भाजपच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी काँग्रेस मैदानात, 10 हजार गांधीदूत नेमणार; नाना पटोलेंच्या आणखी घोषणा काय?

| Updated on: Dec 28, 2021 | 6:35 PM

भाजपच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी आता काँग्रेसही सज्ज झाली आहे. सोशल मीडियातून भाजपकडून होणारा विखारी प्रचार रोखण्यासाटी काँग्रेस राज्यभरात दहा हजार गांधीदूत नेमणार आहे.

भाजपच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी काँग्रेस मैदानात, 10 हजार गांधीदूत नेमणार; नाना पटोलेंच्या आणखी घोषणा काय?
nana patole
Follow us on

मुंबई: भाजपच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी आता काँग्रेसही सज्ज झाली आहे. सोशल मीडियातून भाजपकडून होणारा विखारी प्रचार रोखण्यासाटी काँग्रेस राज्यभरात दहा हजार गांधीदूत नेमणार आहे. हे दहा हजार गांधीदूत भाजपला सोशल मीडियातून उत्तर देणार असून भाजपचे सर्व मुद्दे खोडून काडणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

काँग्रेसच्या ‘जॉईन काँग्रेस सोशल मीडिया मिशन 10 हजार’ या मोहिमेचे उद्घाटन नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राजीव गांधी यांनी देशाला एकविसाव्या शतकात नेण्याचे स्वप्न पाहून आधुनिक तंत्रज्ञान आणले. त्यावेळी हेच भाजपावाले त्याला तीव्र विरोध करत होते. मात्र, त्याच तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून भाजप आज समाजात खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करत आहे. परंतु त्यांना आता काँग्रेसकडूनही चोख उत्तर मिळेल, असं पटोले म्हणाले.

भाजप ही खोटी माहिती पसरवणारी फॅक्ट्री

प्रदेश काँग्रेसकडून मी गांधीदूत ही सोशल मीडिया मोहीम एक वर्षापूर्वी सुरु करण्यात आली होती. या अंतर्गत राज्यभरातील सुमारे 15000 लोकांनी नोंदणी केली होती व त्यांची माहिती प्राप्त झाली होती. या 15000 जणांमधून 10000 लोकांना “जॉईन काँग्रेस सोशल मीडिया मिशन 10000” या मोहिमेतून काँग्रेसचे सोशल मीडिया पदाधिकारी म्हणून नियुक्त केले जाणार आहेत. भाजपकडून केला जात असलेला अपप्रचार काँग्रेस सकारात्मकतेने खोडून काढेल आणि सत्य माहिती जनतेसमोर आणेल. भाजप ही खोटी माहिती पसरवणारी मोठी फॅक्टरी आहे. पण आता याच माध्यमातून भाजपला काँग्रेसकडून उत्तर मिळेल, असं सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी सांगितलं. यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडियाचे राज्य अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, संघटन सरचिटणीस देवानंद पवार व सोशल मीडियाचे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

राज्यपालांनी राजकारण करू नये

यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नियमाला धरून घेण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा होता. नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असे काहीच नाही. राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा, राजकारण करु नये, असे पटोले म्हणाले.

फेब्रुवारीत निवडणूक

विधानसभा अध्यक्षपदासंदर्भात राज्यपाल यांना पत्र पाठवून संपूर्ण प्रक्रिया कळवण्यात आली होती. राज्यपालपदाचा कुठेही अपमान होणार नाही याची काळजी सरकारने घेतली होती. अध्यक्षपदाची संपूर्ण प्रक्रिया एका दिवसात पार पाडता आली असती परंतु शेवटच्या दिवशी सकाळी राज्यपालांनी पुन्हा पत्र पाठविले. कायद्याचा पेच निर्माण होऊ नये म्हणून मविआ सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात घेणे टाळले. ही निवडणूक फेब्रुवारीत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

Nana patole : राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा -नाना पटोले

PM Modi in Kanpur: उत्तर प्रदेशात सर्वांनी नोटांचा डोंगर पाहिला, आता सपाचं मौन का?; मोदींचा खरमरीत सवाल

तिसऱ्या लाटेचा धोका! यल्लमादेवीची यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द, तुमच्या गावातील यात्रेचं काय?