मुंबई | 29 जुलै 2023 : महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून पाऊस पडतोय. पावसाचा जोर आज कमी झालाय. पण गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली. अनेक ठिकाणी पाणी साचलं. नद्यांना पूर आला. जनजीवन विस्कळीत झालं. पावसाचा जोर आता कमी झालाय. पाऊस कदाचित काही दिवसांसाठी आराम घेण्याची शक्यता आहे. असं असलं तरी पाऊस विश्रांतीला जात असताना आता पाठीमागे आजार सोडून जात असल्याचं चित्र आहे. वातावरणातील अनिश्चित बदलांमुले आता साथीचे रोग पसरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे डोळे येणे. राज्यभरात सध्या डोळ्यांची साथ पसरली आहे. विशेषत: पुण्यात ही साथ जास्त वाढली आहे.
लहान मुलांना डोळे येण्याचं प्रमाण अधिक आहे. याावर्षी डोळ्यांचा संसर्ग सौम्य स्वरुपाचा दिसत असला तरी संसर्ग मात्र मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान, घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्या. गरज असल्यास डॉक्टरांकडे जा, असा सल्ला ज्येष्ठ डॉक्टरांनी दिला आहे.
पुणे जिल्ह्यात डोळ्यांची साथ जास्त वाढली आहे. पुण्यात 7 हजार 871 रुग्ण आढळले आहेत. तर बुलढाणा जिल्ह्यात 6 हजार 693 रुग्ण आढळले आहेत. अमरावती जिल्ह्यात 2 हजार 611 रुग्ण आढळले आहेत. गोंदिया जिल्ह्यात 2 हजार 591 रुग्णांची नोंद झालीय. तर धुळे जिल्ह्यात 2 हजार 295 रुग्णांची नोंद झालीय. जालना जिल्ह्यात 1 हजार 512 रुग्ण आढळले आहेत.
वाशिम जिल्ह्यात 1 हजार 427 रुग्ण आढळले आहेत. तर हिंगोली जिल्ह्यात 1 हजार 425 रुग्ण आढळले आहेत. नागपूर जिल्ह्यात 1 हजार 323 रुग्ण आढळले आहेत. नाशिक शहरात देखील डोळ्यांच्या आजाराची साथ पसरली आहे. शहरात दोन दिवसात 156 रुग्ण आढळले आहेत.
आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. “डोळे येणे आजार हा औषधांशिवाय बरा होऊ शकतो. रुग्णांना घाबरून जाण्याची गरज नाही. दिवसातून हात पाच वेळा स्वच्छ धुवा. डोळे पाण्यानं स्वच्छ करा. मेडिकलमध्ये जाऊन स्टेरॉईड डोळ्यांमध्ये सोडलं तर धोका संभवू शकतो. मात्र डोळे आलेल्या रुग्णांपासून दूर राहा”, असं आवाहन त्यांनी केलं आहे.