मुंबई, दि.26 डिसेंबर | जगभरात दोन वर्ष धुमाकूळ माजवणाऱ्या कोरोनाची लस आल्यानंतर दिलासा मिळाला होता. आता कोरोना हद्दपार होईल, अशी अपेक्षा असताना नवीन व्हेरियंट धोकादायक ठरत आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या नव्या सब-व्हेरियंट JN.1 चा भारतात प्रसार सुरु झाला आहे. चीन, सिंगापूरनंतर आता भारतात नवीन व्हेरियंटची संसर्गाची प्रकरणे वाढत आहे. यामुळे चिंता निर्माण झाली आहे. आता या व्हेरियंटमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी केरळमध्ये कोरोनाचा स्फोट झाला आहे. गेल्या २४ तासांत ११५ नवीन रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात नवीन व्हेरियंटचे दहा रुग्ण आहेत.
कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यावेळी करोनाचा नवीन उपप्रकार जेएन १ व्हेरिएंट त्रासदायक ठरण्याची चिन्ह दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. भारतात जेएन १ बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या भागात जेएन १ या नवीन व्हेरियंटचे बाधित रुग्ण आढळत आहेत. त्याचवेळी कर्नाटकातून धक्कादायक बातमी आली आहे. सोमवारी २५ डिसेंबर रोजी कर्नाटकात ३४ नव्या जेएन १ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. केरळमध्ये दररोज शेकडो करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. सोमवारी राज्यात ११५ नवीन रुग्ण सापडले. कर्नाटकच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जेएन १ चे ३४ रुग्ण आढळले आहेत. यापैकी २० रुग्ण एकट्या बंगळुरू शहरात सापडले आहेत. तर चार रुग्ण म्हैसूर आणि तीन रुग्ण मांड्या येथे सापडले आहेत. रामनगर, बंगळुरू ग्रामीण, कोडागू आणि चामराजा नगरमध्ये प्रत्येकी एक जेएन.१ बाधित रुग्ण आढळला आहे. तसेच तीन रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. केरळमध्ये गेल्या २४ तासांत ११५ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच राज्यातील सक्रीय करोनाबाधित रुग्णांची संख्या १,७४९ वर पोहोचली आहे.