मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आलाय. इतकंच नाही तर तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्ती धोका असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. अशावेळी कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्कर्फोसमधील डॉक्टरांचा आणि महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांचा संवाद घडवून आणावा. तसंच बालकांना कोरोनापासून कशापद्धतीने सुरक्षित करता येईल, याचं मार्गदर्शन करावं असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. (CM Uddhav Thackeray’s important advice to the task force)
महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सध्याच्या व प्रस्तावित योजना, त्यांचा अंदाजित खर्च, अधिकच्या निधीची आवश्यकता याची एकत्रित माहिती आपल्याला देण्यात यावी. ज्यामुळे विभागाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काय करता येऊ शकेल याचा धोरणात्मक निर्णय घेता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच कोरोनामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक मृत्यू पावले किंवा एक पालक मृत्यू पावला अशा बालकांबाबत विभागाने धोरण निश्चित करावे. यामध्ये मुलांच्या संगोपनापासून शिक्षणापर्यंतचे लाभ त्यांना कसे देता येतील याची माहिती देण्यात यावी, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजना, निधी, कार्यपद्धतीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा. महिला व बालविकास मंत्री @AdvYashomatiINC उपस्थित. कोरोनापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी तज्ज्ञांचा टास्कफोर्स व विभागाने समन्वयाने काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. pic.twitter.com/1nP4CG40Mz
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 28, 2021
माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून कुटुंबांचे सर्वेक्षण झालं आहे. या सर्वेक्षणाची संपूर्ण माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. त्यात बालकांची माहिती ही समाविष्ट आहे. यामधील कमी वजनाच्या बालकांकडे अधिक लक्ष देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असंही मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामीण, आदिवासी तसेच शहरी भागातील बालकांचे कुपोषण कमी करण्याच्यादृष्टीने आयसीडीएसची पुनर्रचना करण्यासंदर्भात विभागाने प्रस्ताव सादर करावा, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
राज्यातील बचतगटांनी बाजारपेठेतील मागणी आधारित वस्तुंचे उत्पादन करावं, उत्पादनात नावीन्य आणताना कोणत्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ आहे याचेही संशोधन केलं जावं. जागतिक बाजारपेठेत निघणाऱ्या निविदांमध्ये सहभागी होऊन राज्यातील बचतगटांना काम मिळवून देण्याच्यादृष्टीने विभागाने प्रयत्न करावेत. राज्यातील बचतगट उत्पादित करत असलेल्या उत्पादनांची माहिती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचली पाहिजे, यादृष्टीने वस्तुंच्या उत्पादनात आणि त्याच्या सादरीकरणात वेगळेपण आणावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. अंगणवाडी सेविका -मदतनीस, आशा वर्कर्स आणि एएनएम हा ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा आणि इतर सेवांचा पाठकणा आहे, यांना अधिक सक्षम कसे करता येईल यादृष्टीनेही विभागाने लक्ष द्यावं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले
अनाथालये व इतर बालसंस्थांमधून बाहेर पडणाऱ्या 18 ते 23 वयोगटातील बालकांसाठी राज्याचे स्वतंत्र धोरण असावे, त्यांना कौशल्य विकासाचे विविध प्रशिक्षणे देऊन स्वावलंबी करणे या माध्यमातून केले पाहिजे असं यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या. त्यांनी महिला व बालविकास विभागाच्या विविध गरजा आणि वाढीव निधी संदर्भातील मागणीची माहिती दिली. सर्व शासकीय विभागांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष आहे. त्यामध्ये निधीची तरतूद करून महिला आणि बालकांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी व्हावी. या माध्यमातून महिलांसाठी विभागांतर्गत ज्या सुविधा निर्माण करता येतील, अशा सुविधांची निर्मिती व्हावी असंही ठाकुर यावेळी म्हणाल्या.
संबंधित बातम्या :
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना सरकार आधार देणार?, यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
Video: वेल डन! फडणवीसांचा एक निर्णय, जो प्रत्येक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधीनं कम्पलसरी राबवावा!
CM Uddhav Thackeray’s important advice to the task force