मुंबई: देशातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत दिवसागणिक कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक वाढताना दिसत आहे. मुंबईच्या चेंबूर परिसरातील एका इमारतीत राहणाऱ्या 22 लोकांचा एकाचवेळी कोरोनाची लागण झाली आहे. सिंधी सोसायटी परिसरात हा प्रकार घडला. त्यामुळे चेंबूर परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सिंधी सोसायटीत जवळपास 506 लोक वास्तव्याला आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Coronavirus spread in Mumbai chembur sindhi society)
या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आता वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. पालिकेने ही इमारत आणि सिंधी सोसायटी पूर्णपणे सील केली आहे. तसेच पालिकेने घरकामासाठी येणाऱ्या महिलांनाही सोसायटीत जाण्यास मज्जाव केला आहे. या सोसायटीत कम्युनिटी किचन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतही आज दिवसभरातील वाढलेला कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 10 हजार 428 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 हजार 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज दिवसभरात 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 16 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 14 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आहे.
मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर 80 टक्के झाला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता 35 दिवसांवर येऊन ठेपलाय. 31 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर 1.91 टक्के झाला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पण राज्यातील कोरोनाचा वाढता प्रसार काही थांबण्याचं नाव घेत नाही. आज दिवसभरात राज्यात तब्बल 59 हजार 907 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 322 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची स्थिती किती विदारक बनत चालली आहे, याचा अंदाज येऊ शकतो.
संबंधित बातम्या:
Maharashtra Corona Update : चिंताजनक; दिवसभरात 60 हजाराच्या घरात रुग्ण, मृतांचा आकडाही 300 पार
कोरोना झालाय, पण घरीच राहून उपचार घ्यायचेत , मग 25 हजाराच्या बाँडवर सही करा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसमोर ‘धारावी पॅटर्न’ही फोल?; मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान
(Coronavirus spread in Mumbai chembur sindhi society)