मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत आहे. या चक्रीवादळाचे गंभीर परिणाम दिसून येत आहे. चक्रीवादळामुळे होणारा धोका लक्षात घेता केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत सर्वच सतर्क आहेत. NDRF च्या 17 टीम आणि SDRF च्या 12 टीम गुजरातमध्ये तैनात आहेत. त्याचबरोबर नौदलाची 4 जहाजे स्टँडबाय ठेवण्यात आली आहेत. याशिवाय, खबरदारीचा उपाय म्हणून किनाऱ्यालगत राहणाऱ्या 74,000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. वादळमुळे किनारपट्टीवर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि महाराष्ट्रासह 9 राज्यांना बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका आहे. लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि राजस्थान (पश्चिम) ही 9 राज्ये आहेत. जेव्हा बिपरजॉय गुजरातच्या किनारपट्टीला धडकेल, त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 150 किमीवर जाण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे आधी ऑरेंज अलर्ट जारी केले होते. आता रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ कोकणातून पुढे सरकले असले तरीही या वादळाचा प्रभाव समुद्रावर अजूनही कायम असल्याचे पाहायला मिळतंय. कोकणातील बहुतांश किनारपट्टीवरील भागाला लाटांचा मोठा तडाखा बसला आहे. गुहागरमध्ये बाग परिसरात कासव संवर्धन करण्यासाठी वापरात असलेल्या जागेवर तर समुद्राच्या लाटांनी अतिक्रमण करत आजूबाजूचा भाग देखील व्यापला आहे. कासवाची अंडी संवर्धित करण्याचे ठिकाण देखील झालंय उध्वस्त झाली आहेत. याठिकाणी असलेली सुरुची अनेक झाडे लाटांच्या दणक्याने जमीनदोस्त झाली असून पाण्यात वाहून गेली आहेत. मान्सून सक्रिय होत असताना किनारपट्टीवरील वाऱ्याचा वाढता वेग आणि अजस्त्र लाटा धडकी भरवणाऱ्या आहेत.
अरब महासागरात ६ जून रोजी चक्रीवादळ आले. या चक्रीवादळाला बिपरजॉय नाव देण्यात आले. बिपरजॉय हा शब्द बंगाली आहे. त्याचा अर्थ संकट होते. बिपरजॉय हे नाव बांगलादेशने दिले.
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड, म्यानमार, ओमान आणि मालदीव यांनी वादळांच्या नावांची यादी जागतिक हवामान संघटनेला दिली आहे. या देशांमध्ये कुठेतरी वादळ आले की त्या नावांवरून एक नाव निवडले जाते. यावेळी नाव ठेवण्याची पाळी बांगलादेशची असल्याने बांगलादेशने ‘बिपरजॉय’ असे नाव दिले. ही यादी पुढील 25 वर्षांसाठी तयार करण्यात आली आहे. 25 वर्षांपासून बनवलेली ही यादी तयार करताना दरवर्षी किमान पाच चक्रीवादळे होतील असे गृहीत धरले आहे.