सायरस पुनावाला यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या; मनसेची मागणी

| Updated on: Dec 30, 2020 | 3:47 PM

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या माध्यमातून या संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला यांनी अनेक रोगांवर लस उपलब्ध करून दिल्या आहेत. (Cyrus Poonawalla must be honoured by Maharashtra Bhushan award)

सायरस पुनावाला यांना महाराष्ट्र भूषण द्या; मनसेची मागणी
Follow us on

मुंबई: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या माध्यमातून या संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला यांनी अनेक रोगांवर लस उपलब्ध करून दिल्या आहेत. आता ही संस्था कोविडवरील लसीचं संशोधन करत आहे. सायरस पुनावाला यांचं हे योगदान लक्षात घेऊन त्यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. (Cyrus Poonawalla must be honoured by Maharashtra Bhushan award)

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एक ट्विट करून ही मागणी केली आहे. सायरस पुनावाला हे सीरम इन्स्टिट्युटच्या माध्यमातून गेली अनेक दशके विविध रोगांवर लस उपलब्ध करून देत आहेत. या महामारीत सुद्धा पूर्ण जगाला त्यांनी लसीचे मोठया प्रमाणात उत्पादन करून मोठा दिलासा दिला आहे. पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे असेच आहे. त्यामुळे सायरस पुनावाला यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे ही विनंती, असं ट्विट नांदगावकर यांनी केलं आहे.

सीरम इन्स्टिट्यूट आणि लस निर्मितीचा इतिहास

सायरस पुनावाला यांनी पुण्यातील हडपसर भागात 1966 साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. सायरस पुनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लस निर्मितीसाठी केला जातो. त्यातूनच सायरस पुनावाला यांनी लस निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आणि तिथून सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रवासाला सुरुवात झाली.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही विविध आजारांवरील लस निर्माण करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून सध्या पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवर ज्या लसींचा उपयोग केला जातो, त्यापैकी 65 टक्के लस या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचा ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्रा झेनेका यांच्या सोबत करार झाला आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी कोरोनाची एक लस सरकारला अडीचशे रुपयांना दिली जाईल, असं जाहीर केलं आहे. तसंच एकूण लसीच्या 90 टक्के लस ही सुरुवातीला भारतीय नागरिकांना दिली जाईल, असंही पुनावाला यांनी स्पष्ट केलं आहे. (Cyrus Poonawalla must be honoured by Maharashtra Bhushan award)

 

संबंधित बातम्या:

सीरमच्या लशीला मंजुरी मिळणार का? महत्त्वाच्या बैठकीकडे देशाचे लक्ष

नरेंद्र मोदींकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीचा आढावा, अनेक आजारांवरील लस निर्मितीमध्ये ‘सीरम’चं मोठं योगदान

Good News! भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार

(Cyrus Poonawalla must be honoured by Maharashtra Bhushan award)