dussehra melava | अखेर शिवाजी पार्क मैदानावर ‘या’ गटाचा दसरा मेळावा होणार

| Updated on: Oct 10, 2023 | 1:37 PM

dussehra melava | शिवाजी पार्क मैदानात कुठल्या गटाचा दसरा मेळावा होणार? ते स्पष्ट झालय. गेल्या अनेक वर्षांपासून दसऱ्याला शिवाजी पार्क मैदानात शिवसेनेचा दसरा मेळावा संपन्न होतोय. आता शिवसेनेत दोन गट आहेत.

dussehra melava | अखेर शिवाजी पार्क मैदानावर या गटाचा दसरा मेळावा होणार
shinde vs uddhav
Follow us on

मुंबई (विनायक डावरुंग) : दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. मागच्या अनेक वर्षांपासून एखाद-दुसऱ्या वर्षाचा अपवाद वगळता शिवाजी पार्क मैदानात शिवसेनेचा दसरा मेळावा संपन्न झाला आहे. खरंतर शिवसेनेचा दसरा मेळावा झाल्यानंतर चर्चा होते, वाद होतात. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वर्ष आपल्या भाषणांनी दसरा मेळावा गाजवला. बाळासाहेब कोणावर टीकेचे आसूड ओढणार याची विरोधी पक्षांपासून मीडियामध्ये उत्सुक्ता असायची. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे विचारांच सोन म्हणून पाहिलं जायचं. दसरा मेळाव्यात कोणता नवीन विचार मिळणार? पक्षाची नवीन भूमिका कोणती असणार? म्हणून शिवसैनिक सुद्धा मोठ्या संख्येने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर येतात. गेली अनेक वर्ष ही परंपरा सुरु आहे. पण मागच्यावर्षीपासून शिवसेनेचा दसरा मेळावा होण्याआधीच वादाची मालिका सुरु झालीय.

मागच्यावर्षी शिवसेनेत फूट पडली. दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं. उरलेले 15 आमदार उद्धव ठाकरेंसोबत आहे. आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. मागच्यावर्षी सर्वात आधी कोणत्या गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होणार? यावरुन वाद झाला. त्यावेळी सुद्धा शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांनी मैदान आपल्यालाच मिळालं पाहिजे असा दावा केला होता. पण अखेर एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली. त्यानंतर आता यावर्षी शिंदे गटाकडून शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी पालिकेकडे पहिला अर्ज केला होता. पण आता एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली आहे.

राजकीय वाद, राडा टळला

शिंदे गट शिवाजी पार्क मैदानासाठी केलेला अर्ज मागे घेणार आहे. दादरचे शिवसेना आमदार सदा सरवणकर पालिका अधिकाऱ्यांना भेटून अर्ज मागे घेतील. त्यामुळे ठाकरे गटाचा शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात होईल असं बोलल जातय. शिंदे गटाने एक पाऊल मागे घेतलय. त्यामुळे दोन्ही गटांमधील राजकीय वाद, राडा टळला आहे.