निवृत्ती बाबर, Tv9 मराठी, मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : राज्यात सकाळपासून आज दहीहंडीचा उत्साह आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई आणि ठाण्यात तर दहीहंडीचा चांगलाच उत्साह आहे. शेकडो गोविंदा पथकांनी विविध ठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमस्थळी दाखल होत सहभाग नोंदवला आहे. अनेक गोविंदा पथकांनी चार थर, पाच थर ते नऊ थरांपर्यंत सलामी देवून लाखोंची बक्षिसं जिंकली आहेत. याशिवाय दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटींदेखील सहभाग घेतला आहे. दहीहंडी फोडत असताना किंवा सलामी देताना, तसेच थर लावत असताना अपघाताच्या देखील घटना यावर्षी समोर आल्या आहेत.
दहीहंडीचे थर लावत असताना यावर्षी 77 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व गोविंदांना मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आलाय. यापैकी अनेक गोविंदांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलाय. आतापर्यंत जखमी झालेल्या 77 गोविंदांपैकी 18 गोविंदांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर 7 जणांचा दाखल करण्यात आलंय. तसेच 52 जणांवर ओपीडीत उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे यावर्षी गोविंदा जखमी झाले असले तरी उत्साहाला गालबोट लागेल अशी कोणतीही घटना घडलेली नाही. सर्व जखमी गोविंदांवर उपचार सुरु आहेत. तसेच अनेकांना डिस्चार्जही देण्यात आलाय. प्रशासनाकडून सर्व गोविंदांसाठी योग्य काळजी घेतली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आजही भाष्ट केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी गोविंदांना विमा देण्यात आल्याचा देखील आज पुनरुच्चार केला.