मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीत नवीन हाजी अली तयार होत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज जिल्हाधिकारी, पोलीस आणि पालिकेचे अधिकारी या दर्ग्याची पाहणी करून तिथले अनधिकृत बांधकाम तोडणार आहेत. मात्र, राज ठाकरे यांनी काल नव्या दर्ग्याचा दावा केला असला तरी ही बातमी दैनिक सामनामध्ये 2016मध्येच छापून आली होती. त्यामुळे राज ठाकरे यांचा दावा नवा नसल्याचं समोर आलं आहे.
दैनिक सामनामध्ये 19 ऑगस्ट 2007 रोजी ही बातमी आली होती. माहीमच्या समुद्रावर हिरवा झेंडा अशा मथळ्याखाली सामनात ही बातमी होती. माहीमच्या खाडीत हजरत ख्वाजा खिज्र हयातून नबी चिल्ला या ट्रस्टला अवघ्या दोन दिवसात वक्फ बोर्डाने माहीमच्या भरसमुद्रात परवानगी दिली आहे. त्यामुळे या ट्रस्टने समुद्रात हिरवा झेंडा फडकवला असल्याचं दैनिक सामनाच्या बातमीत म्हटलं होतं. तसेच हा हिरवा झेंडा समुद्रात फडकवल्याचा फोटोही छापण्यात आला होता. म्हणजे या समुद्रात भराव करण्यास वक्फने ट्रस्टला परवानगी दिली होती. त्यानंतरच या समुद्रात भराव टाकून बांधकाम उभारण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कच्या सभेतून धक्कादायक आरोप केला होता. माहीमच्या दर्ग्याच्या बाजूलाच नवीन दर्गा निर्माण होत आहे. त्या ठिकाणी कबर बांधण्यात आली आहे. त्याच्या आजबाजूला अनधिकृत बांधकाम झाले आहे. माहीम पोलीस स्टेशनच्या बाजूलाच हे सर्व घडत आहे. पालिका अधिकाऱ्यांच्यासमोरच बांधकाम होत आहे. तरीही त्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता एक महिन्यात हे अनधिकृत बांधकाम पाडले नाही तर आम्ही त्याच्या बाजूलाच गणपतीचे मंदिर उभारू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
दरम्यान, आज सकाळी 8 वाजता माहीम दर्ग्याच्या परिसरातील त्या वादग्रस्त जागेवरील बांधकामांवर कारवाई होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहेत. पालिका आणि पोलीस मिळून ही कारवाई करणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सात जणांचं पथक तयार केलं आहे.