आदित्यजी, हिंमत असेल तर ठाण्यातून लढूनच दाखवा; आदित्य ठाकरे यांना कुणाचं आव्हान?

| Updated on: Apr 07, 2023 | 7:57 AM

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना ठाण्यातून निवडणूक लढण्याचं आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर तुम्ही लढून दाखवा. तुमचं डिपॉझिट जप्त होईल, असं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

आदित्यजी, हिंमत असेल तर ठाण्यातून लढूनच दाखवा; आदित्य ठाकरे यांना कुणाचं आव्हान?
Aaditya Thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातील जनआक्रोश मोर्चातून ठाण्यातून लढण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आदित्य ठाकरे कुणाच्या विरोधात लढणार याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. आदित्य ठाकरे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तर आव्हान देणार नाही ना? अशी चर्चा ही रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचले आहे. हिंमत असेल तर तुम्ही ठाण्यातून उभे राहाच. तुमचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय ठाणेकर राहणार नाहीत, अशा शब्दात शीतल म्हात्रे यांनी डिवचले आहे. शीतल म्हात्रे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करून आदित्य ठाकरे यांना टोले लगावले आहेत.

धर्मवीर आनंद दिघेजी यांच्या ठाण्यात आदित्य ठाकरे यांनी पिकनिक नेली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी अनेक वल्गना केल्या. भाषणं दिली. ए प्लस वरळी करणार होते. त्या वरळीत जनाधार मिळणार नाही हे त्यांना कळून चुकलं आहे. तीन तीन आमदारांचा बळी घेतलेल्या वरळीतून आपण निवडून येणार नाही हे लक्षात आल्यामुळे मी ठाण्याला उभं राहणार असं सांगितलं. ठाण्यातील जनता सूज्ञ आहे. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय ठाणेकर राहणार नाही, असा इशारा शीतल म्हात्रे यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

वेळ, तारीख लिहून ठेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची 25 वर्ष प्रगती केली आहे. एकनाथ शिंदे हे सुखदुखाला धावून जाणारे आहेत. तुम्ही पिकनिकला आलात तसेच जा. तुम्ही ठाण्यावर दावा सांगितला आहे. त्यामुळे ठाण्यातल्या आजीमाजी आमदार आणि नवश्या गवश्या इच्छुकांना आपला बळी तर जाणार नाही ना अशी भीती वाटत आहे. आता जे बोलतो ते करतो हे दाखवून द्या. कारण जे बोलतो ते करत नाही, अशी तुम्हा पितापुत्रांची ख्याती आहे. वेळ, तारीख लिहून ठेवा आणि खरोखर हिंमत असेल तर ठाण्याला जिंकायचं सोडा, निवडणुकीला उभं राहून दाखवा. ठाणेकर तुमचं डिपॉझिट जप्त करणार, असंही म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ठाण्यात ठाकरे गटाचा मेळावा होता. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातून लढण्याचे संकेत दिले होते. आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही ठाण्यात शिवसेनेला निवडून द्या. ठाण्यातील दादागिरी मोडीत काढायची आहे. एक महिलेला मारहाण झाली. पण मुख्यमंत्री त्याची दखल घेत नाहीत. पोलीस काही करत नाही. ठाण्यात चाललंय तरी काय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती.