मुंबई : नागरिकांसाठीच्या तब्बल 80 सुविधा त्यांच्या मोबाईलवर ‘व्हॉट्सअॅप चॅट-बॉट’ द्वारे सहजपणे उपलब्ध करून देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली पालिका असून, माहिती तंत्रज्ञानाचा नागरिकांना अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल याचे हे उत्तम उदाहरण आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेचे कौतुक केले. नवीन तंत्रज्ञानानुसार सुविधा अपडेट करणे मोठे काम आहे, महापालिकेने त्याकडे लक्ष द्यावे असेही ते म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’ या तंत्रज्ञानस्नेही व लोकाभिमुख उपक्रमाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी विविध समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’द्वारे जनतेला 80 हून अधिक सुविधा घरबसल्या उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. ‘आपली मुंबई, माझी मुंबई’ साठी सातत्याने कार्यरत असणा-या देशातील क्रमांक एकच्या महानगरपालिकेद्वारे ही सुविधा 8999228999 या क्रमांकाद्वारे नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न पहाता लोकांसाठी काम करावे. शासकीय प्रशासकीय कारभाराबद्दल बोलतांना तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असा गैरसमज आहे. परंतू त्याला छेद देणारा आजचा हा उपक्रम आहे. महापालिका असो किंवा शासन, या यंत्रणांशी थेट व सुलभपणे संवाद झाला पाहिजे असे नागरिकांना नेहमी वाटते, ती सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा काडीचा उपयोग नाही असे सांगून ते म्हणाले की, वर्क फ्रॉम होमची सुविधा या उपक्रमाने अधिक सक्षम केली आहे. महापालिका रोज काय काम करते ? रोज गटार साफ करते, कचरा उचलते, रोज पाणी देते, ही सगळी कामे महापालिका कसे करते ? घाणीत उतरून सफाई कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत असतो या सगळ्याची माहिती नागरिकांना द्यावी अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. महापालिकेवरचा कामाचा ताण कमी करणे हे नागरिकांचेही कर्तव्य आहे असेही ते म्हणाले.
1. बृहन्मुंबई महानगरपालिकेची ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ ही सुविधा 8999228999 या क्रमांकावर उपलब्ध आहे.
2. 8999228999 या क्रमांकावर मराठीमध्ये ‘नमस्कार’ आणि इंग्रजीमध्ये ‘Namaste किंवा Hi’ असा संदेश पाठविल्यानंतर महानगरपालिकेच्या बोधचिन्हासहीत अधिकृत उत्तर प्राप्त होते. याच उत्तरानंतर मराठी वा इंग्रजी असे 2 पर्याय उपलब्ध होतात. यापैकी एका पर्यायावर ‘क्लिक’ केल्यानंतर नागरिक, व्यवसाय अथवा पर्यटक असे 3 पर्याय उपलब्ध होतात. यापैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्या पर्यायानुसार महानगरपालिकेच्या सेवा-सुविधांशी संबंधीत पर्याय नागरिकांना उपलब्ध होतात.
3. आपल्या आवश्यकतेनुसार नागरिकांद्वारे जे-जे पर्याय निवडले जातील, त्या-त्या पर्यायानुसार तब्बल 80 सेवा-सुविधांविषयीची माहिती नागरिकांना तात्काळ उपलब्ध होते. यामध्ये संबंधीत पत्ते, संपर्क क्रमांक, संक्षिप्त माहिती यासारख्या बाबींचा समावेश आहे.
4. या सुविधे अंतर्गत उपलब्ध होणा-या 80 सेवा-सुविधांविषयीची माहिती ही ‘लोकेशन’ आधारित पद्धतीने उपलब्ध होत असल्याने एखादी व्यक्ती ज्या ठिकाणी आहे, ते ठिकाण महानगरपालिकेच्या 24 विभाग कार्यालयांपैकी कोणत्या विभागात आहे, याची माहिती अत्यंत सहजपणे व तात्काळ स्वरुपात उपलब्ध होत आहे.
5. लोकेशन आधारित पद्धतीने ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ द्वारे माहिती उपलब्ध होत असल्यामुळे एखाद्या व्यक्तिच्या ठिकाणाजवळ असणारे महानगरपालिका दवाखाने – रुग्णालये, कोविड केअर सेंटर, मनपा शाळा, उद्याने, पर्यटन स्थळे, अग्निशमन केंद्रे इत्यादी बाबींची माहिती तात्काळ उपलब्ध होत आहे.
6. या सुविधेद्वारे तक्रार वा सूचना करण्याची सेवा उपलब्ध आहे.
7. महानगरपालिकेच्या विविध ऑनलाईन सेवा-सुविधांशी संबंधीत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध.
8. महानगरपालिकेशी संबंधीत विविध शुल्क, आकार इत्यादींचा भरणा करण्यासाठी युपीआय आधारित ऑनलाईन सेवा उपलब्ध.
9. महानगरपालिकेशी व महानगरपालिका क्षेत्राशी संबंधीत विविध घडामोडींची अद्ययावत माहिती उपलब्ध.
10. महानगरपालिकेच्या विविध सेवा-सुविधांशी संबंधीत प्रमाणपत्रे, परवानग्या इत्यादी विषयीची माहिती.
11. ही सुविधा दिवसाचे चोवीसही तास व आठवड्याचे सातही दिवस (24 x 7) पद्धतीने व भ्रमणध्वनी ऍपद्वारे सहजपणे उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना घरबसल्या व अत्यंत सहजपणे माहिती उपलब्ध होणार आहे.
12. या सुविधेसाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी आवश्यक नसून केवळ व्हॉट्सअपद्वारे 8999228999 या क्रमांकावर एक संदेश पाठवून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांच्या हस्ते @mybmc WhatsApp chat bot चे लोकार्पण झाले, याचा अत्यंत आनंद वाटतो. इज ऑफ लिविंगला प्रशासनाने प्रथम प्राधान्य द्यावे, यावर माझा विश्वास असून त्या अनुषंगाने हे महत्वाचे पाऊल आहे. pic.twitter.com/XqkWdhJWy9
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 14, 2022
VIDEO: पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला दांडी, पालिकेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
सेल्फ टेस्ट किटची माहिती पालिकेला देणे बंधनकारक, आयु्क्तांचे नवे आदेश काय? वाचा सविस्तर