मुंबई : मुंबई ते गोवा अशी कोकण मार्गावरील वंदेभारतची ( vande bharat express ) उद्घाटनाची पहिली फेरी 3 जून रोजी मडगांव जंक्शनपासून सुरू होणार आहे. ही ट्रेन नियमित वेळापत्रकानूसार सीएसएमटीहून सकाळी लवकर 5.25 वाजता सुटणार आहे. या ट्रेनला आठ डबे असणार असून एकूण 10 थांबे असणार आहेत. तसेच प्रवाशांसाठी या ट्रेनच्या नियमित फेऱ्या 4 जूनपासून सुरू होणार आहेत. मुंबई ते गोवा हे 586 किमीचे अंतर ही ट्रेन सुमारे आठ तासांत कापणार आहे. या मार्गावरील ‘तेजस एक्सप्रेस’ला 8 तास 50 मिनिटे घेत असल्याने वेगवान वंदेभारतने एका तासांची बचत होणार आहे.
कोकण मार्गावर सोळा डब्यांच्या ऐवजी आठ डब्यांची वंदेभारत चालविण्यात येणार आहे. सध्या या मार्गावरील जलद ट्रेन तेजस एक्सप्रेस मुंबई ते मडगाव प्रवासाला 8 तास 50 मिनिटे घेते. सेमी हायस्पीड वंदेभारत हेच अंतर 7 तास 50 मिनिटे घेणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा एक तास वाचणार आहे. वंदेभारत ही विना इंजिनाची वीजेवर धावणारी मेट्रोच्या धर्तीची ट्रेन असल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास वेगवान होणार आहे.
गोवा ( मडगांव ) ते मुंबई वंदेभारतला पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखविणार आहेत. तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि गोव्याचे मुख्यमंत्री मडगांव येथील मुख्य सोहळ्याला हजर असणार आहेत.
सीएसएमटीहून ही ट्रेन सकाळी 5.25 वा., दादर स. 5.32 वा., ठाणे स. 5.52 वा., पनवेल स. 6.30 वा., रोहा स. 7.30 वा., खेड स. 8.24 वा., रत्नागिरी स. 9.45 वा., कणकवली स. 11.20 वा. थिविम दु.12.28 वा. आणि मडगांव दु.1.15 वा. असे तिचे वेळापत्रक असेल. तर मडगांवहून परतीच्या प्रवासाची गाडी मडगांव दु.2.35 वा., थिविम दु. 3.20 वा., कणकवली दु.4.18 वा., रत्नागिरी सायं.5.45 वा., खेड रात्री 7.08 वा., रोहा रा. 8.20 वा., पनवेल रा.9 वा., ठाणे रा. 9.35 वा., दादर रा.10.05 वा. तर सीएसएमटी रा.10.25 वा. असे वंदेभारतचे मान्सून पर्व वेळापत्रक ठरले आहे. वंदेभारत शुक्रवार वगळता आठवड्याचे सहा दिवस धावणार आहे.
वंदेभारत एक्सप्रेस जरी दर ताशी 160 किमीच्या वेगाने धावणारी असली तर कोकणात मात्र 586 किमीचे अंतर ती सरासरी 74.84 किमीच्या वेगाने धावणार आहे. या वंदेभारतच्या भाडे जाहीर केलेले नसले तरी ते या मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसच्या पेक्षाही जास्त असणार आहे. या ट्रेनला सीएसएमटी, दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिविम, मडगाव असे थांबे असणार आहेत.