महाराष्ट्राच्या दिग्गज नेत्यांकडून आईबद्दल आदर व्यक्त, मंत्रालयातील नेमप्लेटवर झळकलं आईचं नाव

| Updated on: Mar 11, 2024 | 9:10 PM

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या मंत्रालयातील कार्यालयाच्या बाहेर असलेली नावाची पाटी बदलली आहे. दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यालयाच्या बाहेर आईच्या नावासह नवीन नेमप्लेट लावली आहे.

महाराष्ट्राच्या दिग्गज नेत्यांकडून आईबद्दल आदर व्यक्त, मंत्रालयातील नेमप्लेटवर झळकलं आईचं नाव
Follow us on

मुंबई | 11 मार्च 2024 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आईबद्दलचं आपलं वेगळं प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी एक चांगली कृती केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या मंत्रालयातील कार्यालयाच्या बाहेर असलेली नावाची पाटी बदलली आहे. दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यालयाच्या बाहेर आईच्या नावासह नवीन नेमप्लेट लावली आहे. दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या नावाची पाटी बदलली आहे. वडिलांच्या नावासोबतच आईचंही नाव लावता येऊ शकतं, असं दिल्ली हायकोर्टाने म्हटलं आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका केली होती. त्यावर हायकोर्टाने हा निर्णय दिला होता. त्यानंतर मंत्रालयातील फडणवीस आणि अजित पवार यांच्या नावाची पाटी बदलण्यात आली आहे. दोन्ही नेत्यांकडून या माध्यमातून एकप्रकारे आपल्या आईबद्दलचं प्रेम आणि आदर व्यक्त करण्यात आलं आहे.

यंदाच्या जागतिक महिला दिनी (8 मार्च रोजी) जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या चौथ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचा मान उपमुख्यमंत्री तथा वित्त-नियोजनमंत्री अजित पवार यांनी पटकावला आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ अशी पाटी, सुट्टीनंतरच्या पहिल्याच कार्यालयीन दिवशी झळकली आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यालये आहेत. त्यामुळे सहाव्या मजल्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असते. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर येणाऱ्यांसाठी ही पाटी आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरली आहे.

दरम्यान, राज्याच्या महिला धोरणाची तात्काळ अंमलबजावणीबद्दल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीचे सर्वांकडून कौतुक होत आहे. 8 मार्चला जागतिक महिला दिनी राज्याचे चौथे महिला धोरण लागू करण्यात आले. त्यादिवशी महाशिवरात्रीची सुट्टी होती. त्यानंतर शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुटी आली. 8 मार्चनंतर सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर मंत्रालयात आलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांसाठी, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरची ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ ही पाटी आश्चर्याची आणि कौतुकाचा विषय ठरली, तसेच अजित पवार यांच्या कृतीशील कार्यशैलीचा पुनर्प्रत्यय देऊन गेली.