BIG BREAKING | ‘युती धर्म पाळा’, शिंदे-फडणवीस यांच्याकडून समज, खरंच डॅमेज कंट्रोल होणार?

| Updated on: Jun 15, 2023 | 10:42 PM

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद इतका शिगेला गेलाय की दोन्ही बाजूने आता बॅनरवॉर सुरु झाला आहे. या वादानंतर शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसले. वाद जास्त वाढू नये यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

BIG BREAKING |  युती धर्म पाळा, शिंदे-फडणवीस यांच्याकडून समज, खरंच डॅमेज कंट्रोल होणार?
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीतील युतीमधील वाद मिटवल्याची माहिती समोर आली आहे. जाहिरातीच्या वादानंतर आज शिंदे आणि फडणवीसांची सह्याद्री अतिथीगृह येथे बंद दाराआड महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी कल्याणमधील समोर आलेला मोठा वाद मिटवला आहे. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत भाजपचे नेते रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना युती धर्माचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज सोबत एकाच हेलिकॉप्टरने पालघरच्या कार्यक्रमाला गेले. या कार्यक्रमाला रवींद्र चव्हाण देखील आले होते. या कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. दोन्ही नेत्यांना युती धर्म पाळण्याचा आदेश देण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण डोंबिवलीत युतीमधील मोठा वाद उफाळून आला होता. एका पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीच्या मागणीवरुन भाजपच्या स्थानिक नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्याची बदली होत नाही तोपर्यंत कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मदत करायची नाही, असा ठराव केला. विशेष म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्या समक्ष हा सगळा प्रकार घडला. या प्रकारानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे अस्वस्थ झाले. त्यांनी माध्यमांसमोर येत संताप व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

आपण युतीसाठी राजीनामा द्यायला तयार असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा पक्ष कार्यकर्त्यांचं ऐकतो, अशी प्रतिक्रिया दिली. भाजपच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतरही हा वाद शमताना दिसत नव्हता.

या दरम्यान श्रीकांत शिंदे हे दोन दिवसांपूर्वी थेट दिल्लीला गेले होते. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे या वादाची तक्रार थेट भाजपच्या दिल्लीतील हायकमांडकडे केली जाते की काय? अशी चर्चा होती. विशेष म्हणजे शिंदे भाजप नेत्यांना भेटायलाच दिल्लीला गेल्याची चर्चा होती. पण श्रीकांत शिंदे यांनी मुंबईत परतल्यानंतर या चर्चांचं खंडन केलं. आपण आपल्या वैयक्तिक कामांसाठी दिल्लीला गेलो होतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

या सगळ्या घडामोडींनंतर अखेर खुद्द देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून हा माद मिटवण्यासाठी हालचाली झाल्या. दोन्ही बड्या नेत्यांनी श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांना समज दिली. त्यामुळे आता या वादावर पडदा पडला आहे.