विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 3 ऑक्टोबर 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना विरोधकांवर गंभीर आरोप केला. विशेष म्हणजे या आरोपांवेळी त्यांनी चीनमधून फंडींग होत असल्याचा देखील उल्लेख केला. तसेच आगामी लोकसभेत आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणायचं आहे, असं फडणवीस यावेळी म्हणाले. “महाविजय 2024 च्या तयारीला आपण लागलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे. हा संकल्प आहे. मोदींना देशासाठी पंतप्रधान बनवायचं आहे. आपली सर्वांची भाजप पेक्षा देशासाठी काम करतो अशी भावना असली पाहिजे”, असं फडणवीस म्हणाले.
“आपण देशासाठी सीमेची लढाई लढू शकत नाही. पण लोकशाही मार्गाने या देशाला सर्वोच्च शिखरावर पोहचवण्यासाठी आपण लढू शकतो. या राष्ट्राला सर्वोच्च शिखरावर मोदीजी नेत आहेत. 9 वर्षात भारत बदलला आहे. भारतात लोक गरिबी रेषेच्या वर आले आहेत. मोदींनी 9 वर्षात परिवर्तन करुन दाखवले. जगाच्या पाठीवर अर्थव्यवस्थेत वाढ झाली. भारताच्या प्रगतीचा वेग वाढला आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“देशाची अर्थव्यवस्था ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. ही अर्थन्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणेल, असं मोदींनी सांगितलं आहे. अर्थव्यवस्थेत जेव्हा वाढ होते तेव्हा गरिबी दुर जाते, खरी प्रगती होते. आपण आज पाहतोय, देशात महाराष्ट्रात इनफ्रास्ट्रक्चरचं काम झालं आहे. मोदींनी तयार केलेली भ्रष्टाचार विरूद्ध कार्यपद्धती आपण पाहतोय”, असं देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं.
“विरोधकांता संकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करणं आहे. विकासाचा कार्यक्रम नाही. आपलं दुकान बंद होईल म्हणून हे एकत्र आले आहेत. हे समोर आहे, पण यांच्यापाठी एक शक्ती आहे, ज्यांना अराजकता निर्माण करायची आहे. चीनच्या पैशांवर हे लोक अराजकता करत आहेत. यांचा संबध काय? चीन फंडीग करतं”, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“आपली जबाबदारी आहे. आपली काम आपल्याला प्रमाणिकपणाने करायची आहेत. ज्याने पद घेतलं आहे, तशी काम करायची आहेत. पद फक्त प्रतिष्ठेसाठी नाही. आपली जबाबदारी समजून कामे केली पाहिजेत. आपले आज सत्तेत सहकारी आहेत. तीन पक्षाचं सरकार आहे. भाजप मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाने लहान भावाला सांभाळायचं असतं”, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं.
“मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपने आपली भूमिका मांडली आहे. आपण आरक्षणही दिलं. ते हायकोर्टात टिकवलंही, सुप्रीम कोर्टात जोपर्यंत आमचं सरकार होतं तोपर्यंत स्थगिती आली नाही. पण मविआचं सरकार आलं आणि आरक्षण गेलं. आणि आता ज्यांनी घालवले तेच आता तोंडवर करून मागत आहेत”, असं फडणवीस म्हणाले.
“सरकारने आज मोठ्या प्रमाणात विकासाची कामे हातात घेतली आहेत. आपले विरोधक रोज खोटं बोल पण रेटून बोल असं करत आहेत. एक अफवा सकाळी सोडायची आणि एक संध्याकाळी सोडायची. तुम्हाला संधी होती, तुम्ही झोपला होता का? जनता असं विचारते. दरवाजे बंद करुन ज्यांनी सरकारे चालवली ते आम्हाला काय विचारणार आहेत?”, असा सवाल फडणवीसांनी केला.
“काँग्रेस नेते राहुल गांधींना आज ओबीसी आठवायला लागले आहेत. आम्ही ओबीसी मंत्रालय बनवले. ओबीसींच्या विकासावर एक जीआर मविआने दाखवावा. काही लोक लबाड आहेत. अशा लबाडांपासून जनतेला आपल्याला सावध करायचं आहे. लबाड म्हणजे वागणूकीने, कारण आपल्या विरोधकांना असं नाही म्हणायचे”, असं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.