उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या शेवटच्या काळात शिवसेनेचा मुख्यमंत्री करु, असं वचन दिलं होतं, अशी माहिती ठाकरेंनी दिली. ठाकरेंच्या याच वचनबद्दल देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणे करणार होते. याचाच अर्थ असा की, नारायण राणे यांच्यासोबत शिवसेनेत जसं घडलं होतं अगदी तसंच एकनाथ शिंदे यांच्यासोबत घडणार होतं, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“त्यांचं बाळासाहेबांना वचन काय होतं? शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे. का नाही केलं? तुम्ही एकनाथ शिंदेंना सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे. त्यांच्या घरी गार्डही लागले. एकनाथ शिंदेंच्या घरी युतीचं सरकार आलं तेव्हापासून त्यांना मुख्यमंत्री बनायचं होतं. २००४ मध्ये आमचं सरकार येऊ शकतं अशी परिस्थिती होती. राणे प्रचंड फॉर्ममध्ये होते. पुन्हा सरकार आलं तर राणेंचेच लोकं आहेत. आपला मुख्यमंत्री होणार नाही. राणेंच्या जागा कापल्या. परिणाम काय झाला? जागा घटल्या. राणे पक्ष सोडून गेले. हीच गोष्ट त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बाबत केलं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“२०१९च्या निवडणुकीत सर्वच आमदार शिंदेंचं नाव घेतात. हे तर नॉट रिचेबल असतात. एकनाथ शिंदे या आमदारांच्यापाठी राहायचे. त्यांच्या मतदारसंघात जायचे. दौरे करायचे. सरकार आलं तरी आमदार त्यांच्याकडे जात नव्हते. शिंदेंकडे जायचे. त्यांना वाटलं की अजून एक नारायण राणे तयार होत आहे. हे जर अशा प्रकारे मजबुत झाले, आता कापलं नाही तर आदित्य ठाकरे यांच्या हाती पक्ष देता येणार नाही. त्यामुळे त्यांनी शिंदेंचे पंख कापण्यास सुरुवात केली. ते इतपर्यंत पोहोचलं की एकनाथ शिंदे मंत्री, मंत्र्यांच्या विभागाची बैठक मुख्यमंत्री घेऊ शकतो. पण मंत्र्यांना न बोलावता आदित्य ठाकरे बैठक घेऊ लागले”, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“शेवटी शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. सहा महिन्यांपूर्वी मला कुणीतरी विचारलं तिकडे शिंदे आणि इकडेही शिंदे का? तेव्हा मी सांगितलं ते कट्टर आहेत. आमच्याकडे येणार नाहीत. आम्ही प्रयत्न करणार नाही. पण २०१९मध्ये परिस्थिती बदलली. पायाखालची जमीन जात आहे. ज्या मुद्द्यांसाठी लढलो ज्यावर नेतृत्व तयार झालं ते सोडलंय. रोज पंख कापले जात आहेत. आपलं अस्तित्व संपवण्याचा प्रकार आहे. हे लक्षात आलं तेव्हा शिंदे बाहेर पडले”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्याचा बळी राणे गेले. त्याचाच बळी शिंदे गेले. त्यामुळे मोठमोठ्या गोष्टी सांगू नये. तत्त्वाच्या गोष्टी सांगू नये. मला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला हे त्यांनी सांगितलं पाहिजे. शिंदे आणि आमचं ठरलं तेव्हा बैठका कराव्या लागल्या. हवेत तर नाही ठरत. शिंदे राहणार नाही. ते बाहेर पडलेले आहेत. तेव्हा आम्ही विभाजन करायला तयार नव्हतो. आम्ही त्यांच्याशी बैठका केल्या”, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला.