Devendra Fadnavis Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज होत आहे. या विस्तारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमदारांना फोन गेले आहेत. ज्यांना फोन गेले आहे, त्यांचे मंत्रिपद निश्चित झाले आहे. परंतु या विस्तारावरुन नाराजीनाट्यही समोर येऊ लागले आहे. शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकर यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही विस्ताराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. जे.पी.नड्डा आणि अमित शाह यांच्यासोबत बोलणे झाले होते. त्यानंतरही शब्द पाळला गेला नाही, असे आठवले यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. त्याचवेळी शिवसेनेचे नेते तीनदा आमदार म्हणून निवडून आलेले भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी शिवसेना उपनेते व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते मात्र मंत्रिमंडळात कुठेही स्थान न मिळाल्याने अखेर त्यांनी उपनेतेपदाचा हा राजनामा दिला आहे. यामुळे भोंडेकर मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज आहेत की काय? अशा चर्चेला आता सुरु झाल्या आहेत.
सप्टेंबर महिन्यात आमदार नरेंद्र भोंडेकर यांना नागपुरात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी प्रवेश मिळाला नाही, अशा बातम्या आल्या होत्या. नागपुरातील ‘रामगिरी’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचे गेट न उघडल्याने त्यांना परत जावे लागले, अशा बातम्या आल्या. त्यावर नरेंद्र भोंडेकर यांनी हे वृत्त फेटाळले होते. ते म्हणाले होते, दहा मिनिटांनी मला शिंदे साहेबांचा फोन आला होता. त्यांनी भेटण्यास बोलवले होते.
आरपीआयला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी ते पूर्ण केले नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले. ते म्हणाले की, जे. पी. नड्डा आणि अमित शाह यांच्यासोबत माझे बोलणे झाले होते. तेव्हा शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलण्यास सागितले होते. आता मी दोन दिवसांत पुन्हा दिल्लीत जाणार आहे. तेव्हा त्याच्याशी पुन्हा या विषयावर चर्चा करणार आहे.
फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही. निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांनी महायुती काम केले. त्यामुळे पक्षाला मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. परंतु आपण एनडीएमध्ये राहणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम पाहून त्यांच्या सोबत आहे. मी केंद्रात मंत्री आहे. बाहेर पडणार नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले.