Devendra Fadnavis Cabinet Meeting: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर गुरुवारी मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. या बैठकीत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच या बैठकीत कोण येणार आणि कोण अनुपस्थित राहणार? यासंदर्भात चर्चा सुरु होती. फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरच्या पहिल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आले नाहीत. तसेच त्यांच्या पक्षाचे मंत्री दत्तात्रय भरणे आले नाहीत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे बैठकीला आले.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरण सध्या राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. या हत्या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचे नाव घेतले गेले आहे. त्याला ३१ डिसेंबर रोजी अटक झाली. वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या असणाऱ्या संबंधाबाबत विरोधक सातत्याने टीका करत आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी करत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत उपस्थित राहिले. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. परंतु या सर्व प्रकरणात त्यांचे नेते अजित पवार यांची प्रतिक्रिया आली नाही. ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत आले नाही. अजित पवार सध्या विदेशात आहेत. त्यामुळे ते बैठकीला आले नसल्याचे सांगण्यात आले.
खाते वाटपावरुन अजित पवार यांच्या पक्षातील मंत्री दत्तात्रय विठोबा भरणे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास विभाग मिळाला आहे. या खात्यावर ते नाराज असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे त्यांनी अजून पदभारही घेतला नाही. गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते आले नाहीत. ते इंदापूरला असल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय झाला. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी दिली.