मुंबई: खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमधील नावं असलेल्यांची चौकशी करण्यात येत असल्याचं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचा हा इशारा फुसका बार असल्याचं उघड झालं आहे. स्वत: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्यांचं नाव नसल्याचं सांगून ठाकरे सरकारला उघड पाडलं आहे. (devendra fadnavis expose maharashtra government over mohan delkar suicide case)
देवेंद फडणवीस यांनी मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरून ठाकरे सरकारला धारेवर धरले होते. हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या दाव्यानुसार एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केला असून या प्रकरणी वाझे यांना अटक करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली. त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी सरकारची बाजू घेण्याचा प्रयत्न करत डेलकर आत्महत्या प्रकरणावरून विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला.
सुसाईड नोट सभागृहात फडकवली
तुम्ही जबाब वाचून जर वाझेंच्या अटकेची मागणी करत असाल तर त्याच न्यायाने डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्या लोकांची नावं आहेत, त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी परब यांनी लावून धरत विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, फडणवीस यांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला. फडणवीस यांनी थेट डेलकर यांची सुसाईड नोटच सभागृहात फडकवली. माझ्या हातात डेलकर यांची सुसाईड नोट आहे. यात कोणत्याही पक्षाच्या नेत्याचं नाव नाही. प्रशासकाचं नाव आहे, प्रशासक कुणाच्याही पक्षाचे नसतात. सचिन वाझेंना वाचवण्यासाठी हे करु नये, असं सांगत फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांच्या आरोपातील हवा काढून टाकली.
ठाकरे काय म्हणाले होते?
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शिवसेना नेते संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या राजीनाम्याची माहिती दिली होती. त्यावेळी ठाकरे यांनी डेलकर प्रकरणावर भाष्य करत भाजपला इशारेही दिले होते. जशी पूजाने आत्महत्या केली तशी खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. यात महिला आणि पुरुष हा एक फरक आहे. पण डेलकर यांनी आत्महत्या केल्याने त्यांचंही घर उघडं पडलंय. त्यांच्या पत्नी निराधार झाल्यात. त्याही महिलाच आहेत. त्यांची बाजू कोण का मांडत नाही. त्यांच्यासाठी कोणी रस्त्यावर का उतरत नाही, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. डेलकर आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस त्यांचा तपास करेलच. मात्र, तो केंद्रशासित प्रदेश आहे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करतो की त्यांनी तेथील प्रशासनाला मुंबई पोलिसांना सहकार्य करण्यास सांगावं. डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये कुणाची नावं आहेत ती तपासाच्या मार्गाने येऊ द्यात. भाजपने काहीतरी वेडेपणा केला म्हणून मी तसं करणार नाही. या प्रकरणात आम्ही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करु,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.
डेलकर प्रकरणी कुणालाही सोडणार नाही
तर, काल विधानसभेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी डेलकर आत्महत्या प्रकरणावरूनही विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. जे लोक काल सत्तेत होते. मुख्यमंत्री होते, त्यांना राज्याच्या यंत्रणांवर विश्वास नाही. आणि डेलकर यांच्या कुटुंबीयांनी मात्र मला भेटून राज्याच्या यंत्रणेवर विश्वास दाखवला आहे. डेलकर प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. डेलकर यांनी त्यांच्या राज्यातून येऊन महाराष्ट्रात आत्महत्या करावी हे त्या राज्यासाठी लांच्छनास्पद आहे. त्यांच्या सुसाईड नोटममध्ये काही लोकांचा उल्लेख आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येईल. कितीही मोठा असला तरी त्याला शिक्षा देणारच, असा इशाराही त्यांनी दिला होता.
फडणवीसांनी हवा काढली
मुख्यमंत्र्यांनी डेलकर यांच्या सुसाईड नोटमधील नेत्यांची चौकशी करण्याचा इशारा दिला होता. त्यांचा थेट इशारा भाजपकडे होता. भाजपच्या नेत्यांची या सुसाईड नोटमध्ये नावे असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं होतं. मात्र, फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या दाव्यातील हवा काढून टाकली आहे. या सुसाईड नोटमध्ये एकाही भाजप नेत्याचं नाव नसल्याचा दावा करतानाच ती सुसाईड नोटच त्यांनी सभागृहात फडकावली होती. त्यामुळे ठाकरे सरकार तोंडघशी पडलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती ब्रिफ तर केली जात नाही ना? असा सवालही या निमित्ताने राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. (devendra fadnavis expose maharashtra government over mohan delkar suicide case)
Maharashtra Budget 2021 LIVE : महाराष्ट्र अर्थसकंल्पीय अधिवेशन 2021 लाईव्ह https://t.co/W4G5wbYnp5
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 9, 2021
संबंधित बातम्या:
धनंजय गावडेंना शेवटचे भेटले, 40 किमीवर बॉडी मिळाली, फडणवीसांनी उल्लेख केलेले धनंजय गावडे कोण?
डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये नावे असलेल्यांविरोधात गुन्हे दाखल करा; नाना पटोले यांची मागणी
(devendra fadnavis expose maharashtra government over mohan delkar suicide case)