मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा काहीच भरोसा नाही. चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात स्थापन झालेलं सरकार हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले संबंध असल्याची दबक्या आवाजात आधी चर्चा होती. पण ती चर्चा खरी ठरली. त्यांच्यातील चांगल्या संबंधांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चार महिन्यांपूर्वी मोठी घडामोड घडली. महाराष्ट्रात सत्तांतर झालं. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावामुळे त्यांचे इतर पक्षातील नेत्यांसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे कदाचित महाराष्ट्रात सत्तांतर झालं. या सगळ्या घडामोडींदरम्यान देवेंद्र फडणवीस आज काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेले. यावेळी त्यांनी सत्यजित तांबेंना अप्रत्यक्षपणे भाजपात येण्याती खुली ऑफर देऊन टाकली.
“बाळासाहेब माझी एक तक्रार आहे. सत्यजितसारखे नेते तुम्ही आणखी किती दिवस बाहेर ठेवणार आहात? जास्त दिवस बाहेर ठेऊ नका. नाहीतर आमचाही त्यांच्यावर डोळा जातो. कारण चांगली माणसं जमाच करायची असतात”, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी भर कार्यक्रमात केलं. त्यांच्या या विधानानंतर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.
सत्यजित तांबे यांनी कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांच्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद केलाय. त्याच अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांनीदेखील उपस्थिती लावली होती. यावेळी भाषण करताना त्यांनी सत्यजित तांबेंना खुली ऑफर देवून टाकली.
सत्यजित तांबे हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. ते तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात यसश्वी होण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. त्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांचं स्वत:चं यूट्यूबवर चॅनल देखील आहे. त्या माध्यमातून ते तरुणांना मोटिव्हेट करत असतात.