मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष चांगलाच कामाला लागला आहे. भाजप सरकारने केलेली कामे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचावेत यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय आगामी निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मतदान व्हावं यासाठी नागरिकांना सरकारच्या कामांबद्दल माहिती दिली जात आहे. भाजपकडून प्रचारासाठी वेगवगळ्या माध्यमांचा वापर केला जातोय. यामध्ये सोशल मीडियाचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या सोशल मीडिया हाताळणाऱ्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना आणि आदेश दिले आहेत.
आगामी निवडणुकांसाठी कामाला लागा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केलं. “सोशल मीडियावर विरोधकांना उत्तर देताना शिवीगाळ करु नका”, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दादरच्या सोशल मीडिया कार्यशाळेत देवेंद्र फडणवीस यांनी हा सल्ला दिला आहे. विरोधकांकडून खोट्या बातम्या पसरवण्याचं काम सुरु असल्याचंदेखील फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. सोशल मडियावर विरोधकांचे वस्त्रकरण करा, अशी सूचना बावनकुळे यांनी सोशल मीडिया कार्यकर्त्यांना केली आहे. राज्यात 1 लाख सोशल मीडिया वॉरियर्स नेमणार असंही वाबनकुळे यांनी म्हटलं आहे. बानकुळे यांच्या या वक्तव्यातून भाजप पक्षाकडून आगामी निवडणुकांसाठी महत्त्वाची रणनीती आखली जात असल्याचे संकेत मिळत आहेत.