महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक असणार आहे. तसेच येत्या 12 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपने एक उमेदवार जास्त दिल्याने या निवडणुकीत ट्विस्ट आला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा दगाफटका टाळण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट वगळता इतर सर्व पक्ष आपल्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसोबतच प्रत्येक पक्ष, महायुती आणि महाविकास आघाडीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खल सुरु आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना आज अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात जावून राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनीदेखील राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळे या दोन्ही भेटीगाठींची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या भेटीगाठींनंतर त्यामागचं कारण आता समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचं राज्यपालांच्या भेटीचं कारण वेगळं आहे. तर फडणीसांनी राज्यपालांची भेट घेण्यामागचं कारण वेगळं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आधी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीसाठी 12 नावे राज्यपालांना सुचवली आहेत. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती अजूनही झालेली नाही. विशेष म्हणजे हा वाद ठाकरे सरकार असल्यापासूनचा होता. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारकडून सुचवण्यात आलेल्या नावांची नियुक्ती केली नव्हती. या मुद्द्यावरुन ठाकरे सरकार आणि तत्कालीन राज्यपाल यांच्यात राजकीय संघर्ष देखील बघायला मिळाला होता. यानंतर आता महायुती सरकारचे शेवटचे सहा महिने उरले आहेत. या अंतिम कालावधीत राज्यपाल नियु्क्त 12 आमदारांची नियुक्ती व्हावी, तसेच आपण सुचवलेली नावे नियुक्त व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची आज भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते देखील राजभवनात जाताना दिसले. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानेदेखील राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांना विधान परिषदेच्या सभापतींची निवड याच अधिवेशनाच्या काळात व्हावी, अशी विनंती केली. राज्यपालांच्या भेटीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देखील दिली.
“विधान परिषदेच्या सभापतींची निवड ही त्वरित व्हावी, या मागणीसाठी आम्ही राज्यपालांच्या भेटीसाठी गेलो होतो. अडीच वर्षांपासून सभापतीपद रिक्त आहे. हे पद भरलं जावं. कारण कोणतंही संविधानिक पद हे सहा महिन्यापेक्षा जास्त काळ रिक्त ठेवणं चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाने देखील तेच सांगितलं आहे”, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.