महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता आठवडा होत आहे. परंतु त्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले नाही. मुख्यमंत्रीपदाच्या नावावर अजून एकमत होत नाही. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी होत होती. परंतु बुधावारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता दिल्लीपासून मुंबईपर्यंत वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव अंतिम होणार की एखादा धक्कादायक निर्णय होणार? हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यावर भाजपसमोर नवीनच चिंता निर्माण होणार आहे. त्यामुळेच दिल्लीत आज होणाऱ्या बैठकीपूर्वी भाजपचे महासचिव विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात चर्चा झाली.
भाजपसमोर गैर मराठा मुख्यमंत्री करण्याचे सर्वात मोठे संकट आहे. अमित शाह आणि विनोद तावडे यांच्या बैठकीत या मुद्यांवर चर्चा झाली. महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजाच्या मतांवर किती परिणाम होऊ शकतो त्याची बेरीज वजाबाकी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन सुरु करणार आहे. त्याचाही काय परिणाम होऊ शकतो, याबाबत चर्चा झाली. आता गुरुवारी अमित शाह पुन्हा महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहे. या बैठकीत हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपस्थित राहणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.
दिल्लीप्रमाणे मुंबईत बैठका सुरु आहेत. एनसीपी नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. मुंबईत एनसीपी नेता छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. या बैठकांमध्ये मुख्यमंत्रीसोबत मंत्रिमंडळाच्या सूत्रावर काम होत आहे. महायुती सरकारमध्ये भाजप 20, शिवसेनेला 11-12 आणि एनसीपीला 10 मंत्रिपद मिळण्याचा फॉम्युला तयार केला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असणार आहे.
भाजपने राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंह यांना पक्षाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. भाजपमध्येही सातत्याने बैठकांचे सत्र सुरु आहे. यामुळे फडणवीस यांचे नाव निश्चित केले जाते की राजस्थान, मध्य प्रदेशप्रमाणे धक्कादायक नावे समोर येणार आहे, हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.