मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्रातल्या सर्वच टोलनाक्यांवर कारसह छोट्या गाड्यांना टोल नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आता जर छोट्या वाहनांकडून टोल घेतला तर मनसेचे कार्यकर्ते टोल नाके जाळतील, असा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलाय. राज ठाकरेंनी टोलच्या विषयावर सलग दुसऱ्या दिवशीही पत्रकार परिषद घेतली. त्यांनी भर पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार ते फडणवीसांपर्यंत सर्वांचेच व्हिडीओ लावले. विशेष म्हणजे 7 व्हिडीओपैकी 3 व्हिडीओ फडणवीसांचेच आहेत.
सातव्या व्हिडीओवरुन राज ठाकरे फडणवीसांवर संतापले. कारसह छोट्या गाड्यांना टोल नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. तरीही टोल वसुली सुरुच आहे. त्यामुळे फडणवीस धादांत खोटं बोलत असल्याची टीका राज ठाकरेंनी केलीय. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी रविवारी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना सर्वच टोलनाके असा उल्लेख केला. त्यानंतर राज ठाकरेंच्या टोलनाके जाळण्याच्या इशाऱ्यानंतर फडणवीसांच्या कार्यालयानं स्पष्टीकरण दिलंय. सर्वच नाही तर 53 टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमुक्ती असल्याचं या स्पष्टीकरणात सांगण्यात आलंय.
31 मे 2015 पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडील 38 टोलनाक्यांपैकी 11 टोलनाके आणि रस्ते विकास महामंडळाच्या 53 पैकी एक टोलनाका असे एकूण 12 टोलनाके बंद झालेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित 27 टोलनाके आणि राज्य रस्ते विकास महामंडळाचे 26, असे एकूण 53 टोलनाक्यांवर कार, जीप, एसटी महामंडळाच्या बसेस अशा वाहनांना सूट देण्यात आलेली आहे, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलंय.
टोलनाका हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम असून त्याच त्याच कंपन्यांना कंत्राट कसं मिळतंय ? असा सवालही राज ठाकरेंनी केलाय. तर, राष्ट्रीय महामार्गावरील टोल बंद करता येणार नाही, असं केंद्र सरकारनंच सांगितलेलं आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळांनी दिलीय. राज ठाकरेंच्या टोलवरच्या आंदोलनाच्या टायमिंगवर रोहित पवारांनी शंका उपस्थित केलीय. दरम्यान, राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आता पनवेल वाशी आणि मुलुंड टोलनाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून विना टोल छोटी वाहनं सोडण्यास सुरुवात झालीय.