मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीत व्यक्तिगत भेट झाली असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याचं स्वागतच आहे. या भेटीमुळे राज्याला फायदाच होईल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. (devendra fadnavis praises cm thackeray and pm modi visit)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेलं होतं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. या भेटीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी-ठाकरे भेटीचं स्वागत केलं. मोदी आणि ठाकरे यांची व्यक्तिगत भेट झाली की नाही मला माहीत नाही. झाली असेल तर चांगलेच आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. अशा भेटीमुळे राज्याला फायदाच होईल, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोणतंही शिष्टमंडळ जेव्हा पंतप्रधानांना भेटायलं जातं. तेव्हा शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये एकांतात चर्चा होत असते, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
अर्ध्या मागण्या राज्याशी संबंधित
राज्य सरकारने केंद्राकडे 11 मागण्या मांडल्या आहेत. या मागण्यांची फडणवीसांनी चिरफाड करतानाच काही मागण्यांचं स्वागत केलं. केंद्राकडे 11 मागण्या मांडण्यात आल्या. त्यातील 7-8 मागण्या तर राज्याशीच संबंधित आहे. त्याचा केंद्राशी काहीच संबंध नाही. या सर्व मागण्या केंद्राशी संबंधित असत्या तर बरं झालं असतं. राज्य सरकारने कधीही केंद्राकडे राज्याशी संबंधित मागण्या मांडायच्या नसतात, केंद्राशी संबंधित मागण्याच केंद्राकडे मांडायच्या असतात, असा टोला त्यांनी लगावला.
पदोन्नतीतील आरक्षणाचा केंद्राशी संबंध नाही
पदोन्नतीतील आरक्षणाचा मुद्दा हा केंद्राशी थेट संबंधित नाही. तो राज्याचा प्रश्न आहे. सरकारने जीआरला स्थगिती दिल्याने हा प्रश्न उद्भवला आहे. तर मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग नेमण्याची गरज असून ही राज्याच्या अख्त्यारीतील बाब आहे. मात्र, राज्य मागासवर्ग आयोगाची नियुक्ती न करता मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. देशातील प्रत्येक राज्यात ओबीसींचं आरक्षण रद्द झालेलं नाही. केवळ महाराष्ट्रात ओबीसींचं आरक्षण रद्द झालं आहे, असं ते म्हणाले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या
मेट्रो कारशेडसाठी राज्याने केंद्रासोबत संवाद सुरू केला आहे. त्याबद्दल आनंद आहे. मेट्रो रेल्वे लवकर सुरू व्हावी ही आमची इच्छा आहे. जीएसटीचा परतावा देण्यास केंद्राने सुरुवात केली आहे. तरीही हा मुद्दा केंद्रापुढे मांडण्यात आला आहे, ठिक आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे. ही चांगली मागणी आहे. आम्ही या मागणीचं स्वागत करतो. या प्रकरणी सुरू असलेली कोर्टातील केसही संपली आहे. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला पाहिजे, असं ते म्हणाले.
12 सदस्यांच्या नियुक्तीचा केंद्राशी संबंध नाही
राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नियुक्तीचा केंद्राशी काहीही संबंध नाही. हा केंद्राच विषय नाही. सदस्य नियुक्तीचा निर्णय कोणताही पक्ष घेत नाही. तो राज्यपालांचा अधिकार आहे. त्यांच्या अधिकारक्षेत्रातील विषय असल्याने केंद्राशी त्याचा संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. (devendra fadnavis praises cm thackeray and pm modi visit)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 8 June 2021 https://t.co/hpiJQx5FRw #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 8, 2021
संबंधित बातम्या:
‘ते’ दुखणं कायमचं दूर करु, मुख्यमंत्र्यांसमोर अजित पवारांचा पंतप्रधान मोदींना शब्द
(devendra fadnavis praises cm thackeray and pm modi visit)