मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. ललित पाटील याने नाशिकमध्ये ड्रग्स सप्लाय करण्याची फॅक्ट्रीच स्थापन केली होती. याच फॅक्ट्रीतून राज्यात ड्रग्सचा पुरवठा केला जात होता. ललित पाटील याला कामात अनेक राजकीय नेत्यांची मदत होत असल्याचा आरोप होत आहे. सत्ताधारी आणि विरोधक या प्रकरणावरून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करताना दिसत आहे. या प्रकरणावर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे. ललित पाटील प्रकरणात राजकीय नेत्यांचा हात आहे की नाही हेच त्यांनी स्पष्ट केलं आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही9 मराठीला एक्सक्ल्युसिव्ह मुलाखत दिली. टीव्ही9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत फडणवीस यांनी थेट आणि बेधडक उत्तरं दिली. काही लोकांनी ललित पाटील याला निश्चितच मदत केलीय. ही प्राथमिक माहिती आहे. मी गृहमंत्री आहे. त्यामुळे मी माहिती घेऊनच बोलेल. धागेदोरे असेल तर थेटपणे सांगेल. उचलली जीभ लावली टाळ्याला करायला मी यांच्या प्रवक्त्या सारखा नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं.
या प्रकरणातील धागेदोरे बाहेर येणारच आहे. उद्या उठायचं कुणाचं नाव सांगायचं हे योग्य नाही. विरोधकांनी ज्या मंत्र्यांची नावे घेतली त्याबाबत यांच्याकडे काय पुरावं आहेत? ललित पाटीलला अटक झाली. तो शिवसेनेचा नाशिकचा प्रमुख होता. त्याला पूर्वी 14 दिवसाची पोलीस कोठडी होती. तो 14 दिवस हॉस्पिटलमध्ये होता. ड्रग्स प्रकरणातील ही पहिलीच केस असेल त्याची चौकशीच झाली नाही. एखादा आरोपी 14 दिवस पूर्णवेळ अॅडमिट असेल तर कोर्ट तुम्हाला कस्टडी वाढवून देते. ललित पाटील प्रकरणात कस्टडी का मागितली नाही? ही सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या काळात झाली, असा आरोप त्यांनी केला.
आम्ही आता या ड्रग्स माफियांवर कारवाई सुरू केली आहे. कुणालाही सोडलं जाणार नाही. एकालाही सोडणार नाही. मी पक्का निर्णय केला आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांशीही बोललो आहे. जे पोलीसवाले ड्रग्स प्रकरणात गुंतलेले दिसतील त्यांना तर सस्पेन्ड करणारच. कायद्याने ते करावेच लागते. पण आता यापुढे त्यांना डिसमिस करणार आहोत, अशी घोषणाच त्यांनी केली.
देशात ड्रग्सचा प्रादुर्भाव गेल्या 15 ते 20 वर्षात वाढत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यातील डिजींशी चर्चा केली. त्यांना अँटीड्रग्स कमिटी स्थापन करायला सांगितलं. त्यामुळे या समित्या स्थापन झाल्या आहेत. मीही क्राईम कॉन्फरन्स घेतली. पोलीस दलाला सिंगल पॉइंट अजेंडा दिला. ड्रग्स फ्री महाराष्ट्र करा म्हणून सांगितलं. डीआयआरकडून माहिती यायला लागली. त्यामुळे आम्ही ड्रग्स माफिया पकडायला लागलो आहोत, असं फडणवीस म्हणाले.