मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या युगाचे आदर्श आहेत, असं वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज्यातील शिवप्रेमींच्या टीकेचे धनी बनले आहेत. त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून सडकून टीका केली जातेय. त्यांच्या या विधानावर भाजपचे महाराष्ट्रातील बडे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात, याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर त्यांच्या विधानानंतर जवळपास 24 तासांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडलीय. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या विधानाला थेट घरचा आहेर दिलाय.
“जोपर्यंत सूर्य आणि चंद्र पृथ्वीवर आहे तोपर्यंत महाराष्ट्र आणि देशाचे आणि आमच्या सर्वांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहेत. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचे हिरोदेखील छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाहीय”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना सडेतोड उत्तर दिलंय.
“मला वाटत नाही की, राज्यपालांच्या मनातही काही शंका आहे. त्यामुळे राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ निश्चित काढण्यात आले आहेत. पण राज्यपालांच्यादेखील मनात असे कुठलेही भाव नाहीयत. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श महाराष्ट्रात आणि देशात असू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस ठणकावून सांगितलं.
यावेळी भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी फडणवीसांनी आपण त्रिवेदी यांचं वक्तव्य नीट ऐकलेलं आहे. यामध्ये त्यांनी कुठल्या पद्धतीने महाराजांनी माफी मागितलीय, असं म्हटलेलं नाही, अशी भूमिका मांडली.
भगतसिंह कोश्यारी नेमकं काय म्हणाले होते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.
“आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असं वाटतं तुम्हाला कोणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील”, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.