BREAKING : चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

| Updated on: Dec 10, 2022 | 8:01 PM

"जी लोकं अशाप्रकारचं कृत्य करत आहेत, आंदोलन करत आहेत त्यांनी आधी ते वाक्य नीट ऐकलं पाहिजे आणि त्याचा आशय समजून घ्यायला पाहिजे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

BREAKING : चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Follow us on

मुंबई : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या विधानावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. पण त्यानंतर आज पिंपरीत त्यांच्यावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. या सर्व घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

“खरं म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या वाक्याचा शब्द चुकला असेल, तरी त्यांच्या वाक्यातील आशय घेतला पाहिजे. माध्यमांनाही माझी विनंती आहे की, पूर्ण वाक्याचा आशय न दाखवता, केवळ चुकीचा शब्द दाखवणं योग्य नाही. अर्थात मी माध्यमांना दोष देत नाहीय”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

“जी लोकं अशाप्रकारचं कृत्य करत आहेत, आंदोलन करत आहेत त्यांनी आधी ते वाक्य नीट ऐकलं पाहिजे आणि त्याचा आशय समजून घ्यायला पाहिजे. जो शब्द खटकणारा आहे, त्याबद्दल त्यांनी खुलासा केलाय आणि माफीदेखील मागितली आहे. त्यानंतरही त्यांना टार्गेट करणं अतिशय चुकीचं आहे”, असं फडणवीस म्हणाले.

“चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य एवढंच होतं की, आज लोकं अनुदानाच्या मागे लागतात पण त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांनी जनतेतून पैसा उभा करुन शिक्षणाची व्यवस्था उभी केली. हा आशय महत्त्वाचा घेतला पाहिजे. अशा पद्धतीने टार्गेट करणं चुकीचं आहे”, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.

‘माझ्यावरील शाईफेक हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान’, चंद्रकांत पाटील यांचा दावा

दरम्यान, आपल्यावरील शाईफेक हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय. “बाबासाहेबांनी घटना लिहिली. मी पैठणला जे बोललो त्याचा विपर्यास झाला. आणि मी प्रचंड मोठ्या गर्दीत वंदे मातरम सभागृहाच्या उद्घाटनात असं म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर 100 मार्कांचा अभ्यासक्रम केला पाहिजे. दोन पानी धडा काय शिकवता?”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

“पुढे जाऊन मी म्हणालो की, बाबासाहेब आंबेडकर ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत, ज्यांनी घटना लिहिली, ती घटना पुढचे एक हजार वर्ष बदलावी लागणार नाही. काय झाल्यास काय करावं म्हणजे घटना. ते तुम्ही प्रेसवाल्यांनी नाही दाखवलं”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“माझा तुम्हाला दोष नाही. पण तुम्ही पैठणला म्हटलेल्या वाक्याचा विपर्यास करुन महाराष्ट्र पेटवला, मी तुमच्यावर आरोप करत नाही. पण तुम्ही पराचा कावळा केला नसता तर तिथे कोण होतं? वंदे मातरम सभागृहाचं उद्घाटन करताना बाबासाहेबांची प्रचंड स्तुती केली ते तुम्ही दाखवलं नाही. मी पैठणलाही बाबासाहेबांची स्तुती केली”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

‘हिंमत असेल तर समोर या’

“मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सगळे कार्यक्रम करणार आहे. मी चळवळीतला माणूस आहे. मी कुणाला घाबरत नाही. अशाप्रकारे पराचा कावळा करणं, त्याचं तीन-तीनवेळा स्पष्टीकरण दिल्यानंतरही, दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही हा भ्याडपणा, अरे हिंमत असेल तर समोर या. चला सर्व पोलीस डिपार्टमेंटला बाजूला करु”, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

“अरे काय चाललंय? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला एका अर्थाने त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे जपलं की एखाद्या गोष्टीचा विरोध हा लोकशाही मार्गाने करायचा, पण ही झुंडशाही आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.