मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजपात अधिकृत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातील नेते भाजपच्या गळाला कसे लागतात? या प्रश्नाचं उत्तर दिलं. “विरोधी पक्षाने यायचं की नाही हे त्यांना विचारा. आम्ही कोणतंही टार्गेट घेऊन चालत नाही. जे नेते आपल्यासोबत येऊ शकतात, त्यांच्या येण्याने आमच्या पक्षाला बळ मिळू शकतं त्यांच्याशी चर्चा होते. त्यांनाही मुख्यप्रवाहात यावं असं वाटत असेल तर ते येतात. अनेक नेत्यांशी चर्चा सुरू आहे. आकडा वगैरे मानत नाही. पण जमिनीशी जुडलेले नेते आमच्यासोबत येत आहेत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “तुम्ही ज्यांचं नाव घेतलं मी त्यांना अडचणीत आणतं नाही. त्यांचीही आम्ही वाट पाहतोय. पण त्यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“चव्हाण हे दोनदा मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांचा रोल काय असेल हे केंद्रीय भाजपशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. चव्हाण हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे केंद्रीय भाजपशी चर्चा करूनच निर्णय घेऊ”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “अशोक चव्हाण यांची मदत कुठे घ्यायची हे आम्हाला माहीत आहे. योग्यवेळी मदत घेऊ. त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय अनुभवाचा आम्ही फायदा घेणार आहोत. त्यांचा दीर्घ अनुभव आहे”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आम्ही प्रवेश दिला होता. त्यांची सवय आहे, ते एका पदावर टिकत नाही. एका ठिकाणी राहत नाहीत. त्यांना गांभीर्याने घेऊ नका”, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
“त्यांना पक्ष सांभाळता येत नाही. नेते सांभाळता येत नाही. त्यांना त्यांच्या पक्षात मोट बांधता येत नाही. कारण कुणाचा कशात पायपोस नाही. एवढे मोठे नेते एवढ्या वर्षाची पुण्याई सोडून भाजपमध्ये का येत आहे? हे त्यांना कळत नाही. त्यांना काय करतोय हे माहीत नाही. भाजपला विरोध करता करता ते विकासाला विरोध करत आहेत. त्यांना घर का सांभाळता येत नाही? त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. ज्यांनी पक्ष मोठा केला. पक्ष वाढवला ते का पक्ष सोडत आहेत? याचं काँग्रेसने आत्मचिंत केलं पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.