शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या फेसबुक लाईव्ह दरम्यान झाली होती. हत्या करणारा आरोपी मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिसभाईने यानेही स्वतःवर गोळ्या झाडल्या होत्या. या हत्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली. राज्यातील गुन्हेगारी विषयावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोसाळकर हत्या प्रकरणाच्या क्लोजर रिपोर्टसंदर्भात वक्तव्य केले. घोसाळकर संदर्भात आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच जे आरोपी आहे त्याने फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या केली. त्यामुळे क्लोजर रिपोर्टआधी काही वेगळा अँगल निघेल का? त्याचा तपास करण्याचे पोलिसांना सांगितले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
नागपूर येथील घटनेवर मुख्यमंत्री म्हणाले, काही लोकांना जाणीवपूर्वक लक्ष केले. त्या ठिकाणी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली होती. परंतु जाणीवपूर्वक चुकीचा मेसेज व्हायरल करण्यात आला. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, नागपूर प्रकरणात पोलीस आयुक्तांशी मी चर्चा केली आहे. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला त्यांना कबरीतून बाहेर शोधून काढू. आरोपींना इतर प्रकरणात माफी मिळेल, पण पोलिसांवरील हल्ल्याला माफी मिळणार नाही. नागपूर शहर शांत आहे. ते नेहमी शांत असते, असे फडणवीस यांनी म्हटले.
गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये तपासाची पद्धत बदलली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, आता गंभीर गुन्हे घडल्याच्या ठिकाणी फॉरेन्सिक व्हॅन जाऊन नमुने व पुरावे गोळा करेल. ब्लॉक चेन पद्धतीने हे पुरावे गोळा केले जातील. याआधी पुरावे बदलल्याने आरोपी सुटत होते. त्यामुळे नवीन पद्धतीप्रमाणे आता पुरावे बदलता येणार नाही. सर्वांचे चित्रीकरण केले जाईल. पूर्वी पंचाला पोलीस ठाण्यात येऊन पंचनामा करावा लागत होता. आता टॅबद्वारे घटनास्थळी पंचनामा करावा लागणार आहे. त्यामुळे गुन्हा सिद्ध करण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले.
शिक्षा जेव्हा होईल तेव्हा गुन्हेगारांवर वचक तेव्हा बसेल. त्यांच्यात भीती निर्माण होईल. २०१२ पर्यंत १०० पैकी फक्त ९ गुन्हेगारांना शिक्षा मिळत होती. त्यानंतर २०१४ला आपण कायदे तयार केले. आता ही टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत केली आहे. ती आपणास किमान ७५ टक्क्यांपर्यंत न्यावी लागणार आहे. त्यासाठी फॉरेन्सिक नेटवर्क आपण सुरु करत आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.