मुंबई : मुंबई महापालिका (BMC Election 2022) निवडणुकीआधी भाजप आणि महाविकास आघाडी पुन्हा आमनेसामने आली आहे. येणाऱ्या निवडणुकीसाठी दोन्हीकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशाचतच भाजपाच्या पोल खोल अभियानाला (BJP Polkhol Abhiyan) मंगळवारी सुरुवात करण्यात येणार होती, मात्र त्या आधी घडलेल्या एका घटनेवरून सध्या जोरदार वाद पेटला आहे. भाजपच्या या पोलखोल अभियानाची अज्ञातांकडून तोडफडो करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी भाजपने मोठ्या प्रमाणांचा वाहनांचा ताफा तयार केला आहे. अगदी स्क्रीन लावण्यापासून ते मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही सज्ज केले आहे. गेल्या तीन दशकांपासून मुंबई महापालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याचेही भाजप नेत्यांकडून वारंवार सांगण्यात आलं आहे. मात्र त्याआधी घडलेल्या या तोडफोडीच्या घटनेने नव्या वादाला आणि आरोप प्रत्यारोपांना तोंड फुटले आहे.
कितीही अडचणी आणण्याचा, हल्ले करण्याचा प्रयत्न झाला तरी महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारच!
पुण्यात माध्यमांशी संवाद…https://t.co/uqmBxh42OG#Pune pic.twitter.com/DosAKY4MMt— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 19, 2022
या रथाची काच फोडल्याच्या घटनेवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. हा हल्ला कुणी केला हे कायदा आणि सुवस्था ज्या महाविकास आघाडीकडे आहे, तेच याबाबत सांगू शकतील. मात्र ज्या प्रकारे आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढत आहोत, ते पाहून त्यामुळे त्यांना अस्वस्थता वाटत आहे. म्हणून आमच्यावर हल्ले सुरू असल्याची टीका फडणवीसांनी केली आहेत. तसेच आम्ही तरीही भ्रष्टाचार बाहेर काढत राहू, असेही फडणवीस म्हणाले आहेत.
या हल्ल्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारले असता, याबाबत सरकारमधील प्रतिनिधीच सांगू शकतील. मी काही सांगू शकणार नाही. मला याबाबत काहीही माहिती नाही. तसेच शिवसेना आणि भीती हे काधी होऊच शकत नाही, त्यामुळे भाजपला घाबरून शिवसेना असे करणार नाही. भीती हा शब्द शिवसेनेच्या कोशातच नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे.
ते काहीही करू शकतात ! ते हिंदू मुस्लिमांना आपसात लढवू शकतात ! स्वतःच्या गाडीच्या काचा फोडून सहानुभूती मिळवु शकतात ते काहीही करू शकतात… कारण कोल्हापुरमधील पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय त्यामुळे ते काहीही करू शकतात.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 19, 2022
याच घटनेवरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. हे सर्व सहानुभूती मिळवण्यासाठी केलं गेलं आहे, असे म्हणत मिटकरी यांनी हल्लाबोल चढवला आहे.