मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राज्याची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी करतानाच भाजप हा पक्ष विश्वासू नाहीये. त्यांनी उद्धव ठाकरेंना फसवलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही दगाबाजी केली. आता अजितदादा गटाने सांभाळून राहिलं पाहिजे, असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
देवेंद्र फडणवीस फसवत आहेत. हे मनोज जरांगे पाटील म्हणाले ते बरोबर आहे. पाटलांना जसा फडणवीस यांनी दगाफटका केला तसा सर्वांनाच केला आहे. या राज्यातील महिलांशीही दगा फटका केला आहे. राज्यात महिला सुरक्षित कुठे आहेत? त्यांनी इतर समाजांनाही धोका दिला. त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. ते सातत्याने खोटं बोलत आहेत.
एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेतून घेऊ असं फडणवीस म्हणाले. म्हणजे शिंदे अपात्र होणार आहे हे त्यांना माहीत आहे. म्हणजे शिंदेंना दगाफटका केला ना? यांना जर शिंदे अपात्र होणार हे माहीत होतं तर मग उद्धव ठाकरेंचा पक्ष का फोडला? उद्धव ठाकरेंशी दगाफटका केला? उद्धव ठाकरेंशी दगाफटका केलाच पण घटक पक्षाशीहा दगाफटका केला. अजित पवार गटाला विनम्र विनंती आहे, कधी तरी एका ताटात आपण जेवलोय. ते शिंदेंना धोका देत आहेत. त्यामुळे संभल के रहो, इस भाजप से, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जालन्यात लाठीचार्ज झाला. पुण्यात कोयता गँगने डोकं वर काढलं. ड्रग्स माफिया असेल, मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकारला अपयश आलं आहे. हे अपयश देवेंद्र फडणवीस यांचं अधिक आहे. त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे. मराठा आंदोलन सुरू आहे. गृहमंत्र्यांचं अपयश आहे. ते काय करतात इंटेलिजन्सचे इनपूट असेल ना. ते इतर राज्यात प्रचार करतात. तिकडे जातात. राज्यात काय घडतंय त्याची माहिती नाही. फडणवीस यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. त्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
काल सह्याद्रीवर बैठक सुरू होती. तर सत्तेतील आमदार राजभवनावर आंदोलन करत होते. सत्तेतील आमदार राजभवनावर जातात याचा अर्थ त्यांचाच आपल्या सरकारवर विश्वास नाही. ट्रिपल इंजिन सरकारवर विस्वास राहिला नाही हेच स्पष्ट होतंय, असं त्या म्हणाल्या.
मी गेल्या दोन आठवड्यापासून मागणी करत आहे. सर्वपक्षीय बैठक बोलावा आणि विधानसभा अधिवेशन बोलवण्याची मागणी मी सातत्याने केली आहे. लिंगायत, मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणावर सर्वात अधिकवेळा बोलणारी मी एकटी खासदार आहे. चार पाच दिवस अधिवेशन होऊ द्या. प्रत्येक आमदाराला बोलण्याची संधी द्या. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. प्रत्येक आमदाराने स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे. लोकप्रतिनिधी सामान्यांचा आवाज म्हणून येत असतो, असं त्या म्हणाल्या.
फडणवीस आमच्या घराच्याबाजूला आले होते. धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असं म्हटले होते. त्याचं काय झालं? गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचंच सरकार आहे ना? राज्य सरकारने आरक्षण देण्यासाठी 30 दिवस मागितले होते. जरांगे पाटलांनी दिले, तो त्यांचा मोठेपणा आहे. त्यांनी 10 दिवस वाढवून दिले हा जरांगे पाटील यांचा दिलदारपणा होता. हा मॅजिक नंबर आणला कुठून? फडणवीस त्याच सरकारमध्ये आहे ना? सातत्याने सर्व समाजाचा अपमान करा. त्यांना दुखवा आणि फसवा हे भाजपचं धोरण आहे. हे भाजपचं अपयश आहे, अशी टीका त्यांनी केली.