रणजित जाधव, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 9 मार्च 2024 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरातील जगद्गुरू संत तुकाराम महाराज सभागृहाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी संत तुकाराम महाराज यांची पगडी परिधान करत भाषणाला सुरुवात केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “संत तुकाराम महाराज यांच्या नावाने हे नाट्यगृह तयार झालं आहे. त्यामुळे ही संत तुकाराम महाराज यांना ही सांस्कृतिक वंदना आहे”, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं.
“गाढवाला चंदन लावलं तरी ते उकिरड्यावर जाऊन अंगाला राख लावणारच. संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या ओवीत हेच सांगितलेलं आहे. सध्या कोण आपल्या अंगाला राख लावून घेतंय हे तुम्हाला माहित आहेच. मी कोणाबद्दल बोलतोय याची तुम्हाला कल्पना आहेच”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला.
“या नाट्यगृहात तुम्ही चांगली चांगली नाटकं पहाच. पण सध्या नाट्यगृहाबाहेर खुपचं नाटकं सुरू आहेत. वेगवेगळ्या स्क्रिप्ट बनवल्या जातायेत. खोटे नाटे आरोप होतायेत. किती नाट्य रंगवली तरी नटसम्राट होता येत नाही. कारण कट्यार काळजात घुसलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं डंपर पलटी केलेलं आहे”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.