मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोमुळे राजकारणात नवा वाद निर्माण झालाय. संजय राऊत यांनी एका कॅसिनोचा फोटो ट्विट केलाय. फोटोतील कॅसिनो हे चीनच्या मकाऊ येथील असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. संजय राऊतांनी फोटोतील व्यक्तीचं नाव घेतलं नाही. पण फोटोतील व्यक्ती एक हिंदुत्ववादी नेता आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर या फोटोतील व्यक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर वावनकुळे असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. त्यावर भाजपकडून अधिकृत ट्विटर अकाउंटवर स्पष्टीकरण देण्यात आलं. “आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत”, असं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलंय. याशिवाय बावनकुळे यांच्याकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं. आपण मकाऊच्या हॉटेलमध्ये कुटुंबासह थांबलो होतो, असं त्यांनी स्पष्ट केलंय. राऊतांकडून करण्यात आलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय.
“संजय राऊत यांची विकृत मानसिकता त्यातून झळकतेय. ते किती डिसपरेट झालेत, हे त्यातून लक्षात येतंय. चंद्रशेखर बावनकुळे पूर्ण परिवारासह त्या हॉटेलमध्ये थांबले होते. बावनकुळे यांनी जिथे जेवण केलं तिथे रेस्टॉरंट आणि बाजूला कॅसिनो आहे. जाणीवपूर्वक अर्धवट फोटो ट्विट केलाय. पूर्ण फोटो ट्विट केला त्यात स्पष्टपणे लक्षात येतंय, बावनकुळे आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांची मुलगी, नातू, त्यांचा परिवार आहे, सर्वजण त्यामध्ये दिसत आहेत. ही विकृत मानसिकता संपवली पाहिजे, बंद केली पाहिजे. इतकं फ्रस्टेशन योग्य नाही”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“यापेक्षा आणखी काय वाईट परिस्थिती असू शकते? तुम्ही मॉर्फ केलेले फोटो, कापून दिलेले फोटो, असे फोटो टाकून तुम्ही इतके वाईट आरोप करता, म्हणजे ही राजकारणाची पातळी खाली जाण्यासारखंच आहे”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे”, असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. पण त्यांच्या या स्पष्टीकरणवही संजय राऊतांनी टीका केलीय. आपल्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडीओ आहेत, असा दावा संजय राऊतांनी केलाय.