महायुतीकडून आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर भव्य प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र आलेले बघायला मिळाले. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. “शिवाजी पार्कवर बोलत असताना बाळासाहेबांची गर्जना आठवते. ते म्हणायेच… माझ्या तमाम हिंदू माता आणि भगिनींनो… हीच गर्जना आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून ऐकायचो. पण इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यांनी सांगितलं हे चालणार नाही. ते बदला. तेव्हापासून त्यांनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडून दिलं. ही शोकांतिका आहे. बाळासाहेबांची सभा व्हायची… शिवशाहीचा भगवा झेंडा… कडवट हिंदू असं म्हटलं जायचं. आदर्श , शिवरायांचे मावळे असे शब्द ऐकायला मिळायचे. आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून बाप चोरला, घरी बसून काम करणार, गझनी, माझं कुटुंब माझी जबाबदारी यापलिकडे काही ऐकायला येत नाही”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
“मोदींच्या नेतृत्वात जी महायुती तयार झाली आहे. मुंबईत दहा वर्षात परिवर्तन पाहिलं. ते परिवर्तन आम्ही सांगतो. मुंबईचा बदललेला चेहरा सांगतो. मेट्रो, अटल सेतू, मिळणारं घर सांगतो, धारावीचा विकास आम्ही सांगतो… इंडिया आघाडीवाल्यांनो तुम्ही काय सांगू शकता. तुम्ही एक तरी काम दाखवा”, असं चॅलेंज देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
“खरं म्हणजे कोविडचा तो काळ आठवा. त्या काळात आपल्या नातेवाईकांशी लोक बोलत नव्हते. सर्वत्र अंधाकार होता. काय होईल याची चिंता होती. चारच देशांनी लस तयार केली होती. त्यांच्याकडे गेल्यावर आधी आमच्या लोकांना लस देतो आणि मग तुम्हाला लस देतो असं म्हणतील. त्यामुळे मोदींना शास्त्रज्ञांना एकत्र करून कोविडची लस भारतात तयार केली. १४० कोटी भारतीयांना ही लस दिली. मोदी कोविडची लस देत होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात खिचडीचा घोटाळा सुरू होता. रेमडिसिव्हीरचा घोटाळा चालला होता. ऑक्सिजनचा घोटाळा सुरू होता. प्रेतावरचं लोणी खाणं काय होतं हे आम्हाला दिसलं. या ठिकाणी आम्ही कफन चोर पाहत होतो. यांना धडा दाखवला पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“त्यांच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकवले जात आहे. पाकिस्तानचा झेंडे फटकवण्याची वेळ आली तर राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे. आता व्होट जिहादचे व्हिडीओ सुरू आहे. हे सांगत आहेत व्होट जिहाद करा. त्यांना सांगा देशातील लोकांसाठी हा लोकशाहीचा यज्ञ आहे. नागरिक यात आपल्या मतांची समिधा टाकेल आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवले. कोणी व्होट जिहाद करत असेल तर तुम्ही लोकशाहीच्या यज्ञात मतांची समिधा टाकतील”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.