कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना लातूर येथून एअर अँब्युलन्सद्वारे मुंबईत दाखल करण्यात आलंय. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. धनंजय मुंडे यांचा बीडच्या परळी येथे काल रात्री भीषण अपघात झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी लातूरला नेण्यात आलं होतं. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि छातीला इजा झाल्याची माहिती समोर आली होती. आता त्यांना एअर अँब्युलन्सद्वारे मुंबईत उपचारासाठी आणण्यात आलं आहे.
धनंजय मुंडे यांना एअरलिफ्ट करुन मुंबईत आणण्यात आलं आहे. त्यांना जवळपास दुपारी तीन वाजता मुंबईत आणण्यात आलं. त्यानंतर त्यांना अँब्युलन्सद्वारे ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांचे निकटवर्तीय त्यांच्यासोबत आहेत.
धनंजय मुंडे यांच्या डोक्याला मार लागल्याची माहिती समोर आलीय. तसेच धनंजय यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूरहून मुंबईत आणण्यात आलं आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांना अपघातात पायाला सुद्धा मार लागला आहे. छातीत दुखू लागल्याची तक्रार ते करत होते. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईत आणण्यात आलंय.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून अपघाताविषयी माहिती देण्यात आलीय.
काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री12.30 वाजण्याच्या सुमारास@dhananjay_munde साहेबांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे.साहेबांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे
— OfficeofDM (@OfficeofDM) January 4, 2023
“काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. साहेबांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे”, असं ट्विटरवर सांगण्यात आलंय.